आरोग्य विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांचा महर्षि आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्काराने सन्मान
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांना सन 2023 चा महर्षि आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयुर्वेद क्षेत्रात विविधतेने सेवाकार्य करणाऱ्या वैद्यांचा पुण्याचे वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था आणि महर्षि आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार समितीतर्फे सन्मान करण्यात येतो. सन 2023 चा महर्षि आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्काराने डॉ. मिलिंद निकुंभ यांचा वैद्यराज अनंत धर्माधिकारी, वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य विनायक खडीवाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आयुर्वेद शास्त्रातील संकल्पना संशोधनाच्या रुपाने व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर आयुर्वेद शास्त्रात सुवर्ण भविष्यकाळ आहे. विकसित भारत होण्यासाठी मेडिकल टुरिझम बाबत आयुर्वेद साधकांनी अधिक उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महर्षि आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कारात डॉ. मिलिंद निकुंभ यांना एकावन्न हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथील पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात नुकतेच संपन्न झाले. सन 2023 मधील महर्षि आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. मिलिंद निकुंभ यांचे अभिनंदन केले आहे.