अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात 26 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रम
आरोग्य शिबिर, चित्र व ग्रंथ प्रदर्शन, शोभायात्रा, गजीनृत्य, लोककलेचे होणार सादरीकरण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त दि. 26 ते 31 मे 2025 दरम्यान आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, चित्र व ग्रंथ प्रदर्शन, शोभायात्रा, गजीनृत्य व लोककलेचे सादरीकरण होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सप्ताहाचे उद्घाटन सोमवार, दि. 26 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दि. 26 व 27 मे 2025 रोजी आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान पार पडणार आहे. दि. 28 मे रोजी विद्यापीठाच्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 मे रोजी दुपारी तीन वाजता मुंबईचे सुप्रसिद्ध लोककलावंत शिवपाईक योगेश चिकटगावकर यांचा ‘लोककलेची ललकार’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. दि. 30 मे रोजी सकाळी अकरा वाजता शोभायात्रा पार पडणार आहे व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. या विविध कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
31 मे रोजी मुख्य सोहळा; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दि. 31 मे 2025 रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर येथे गजीनृत्याचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता विद्यापीठात मुख्य सोहळा पार पडेल. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर दुपारी तीन वाजता पीएम उषा योजनेतून मिळालेल्या निधीमधून नवीन इमारतींचा पायाभरणी शुभारंभ होणार असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.