भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : भारतीय राज्यघटनाकारांनी संविधान देशाला अर्पण केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाने संविधान सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत संविधानाचा जागर करणारे विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांसह जनसंपर्क कक्ष आणि कोल्हापूर प्रेस क्लब हेही या उपक्रमांत सहभागी होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ श्रीकृष्ण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जात आहेत.
संविधान सप्ताहाचा संक्षिप्त कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल:
मंगळवार (दि २६ नोव्हेंबर)
- सकाळी १०:३० वाजता : मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
- सकाळी १०:४५ वाजता : मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर संविधानाधारित पथनाट्य सादरीकरण
- सकाळी ११:०० वाजता : कै डॉ ग गो जाधव अध्यासन इमारतीमध्ये ‘भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर गोलमेज परिषद
- दुपारी ०२:३० वाजता : कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सप्ताहाचा औपचारिक उद्घाटन समारंभ
बुधवार (दि २७ नोव्हेंबर)
- सकाळी १०:३० वाजता : शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘भारतीय संविधानिक मूल्ये आणि शिक्षण’ या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन
- सकाळी ११:०० वाजता : ‘भारतीय संविधान आणि विकसित भारत’ या विषयावर डॉ श्रीरंजन आवटे (पुणे) यांचे विशेष व्याख्यान
गुरूवार (दि २८ नोव्हेंबर)
- सकाळी ११:०० वाजता : ‘भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता’ या विषयावर निमंत्रितांचे व्याख्यान
- व्याख्यानानंतर ‘संविधान साक्षरता’ या विषयावर विशेष निमंत्रितांची चर्चा
शुक्रवार (दि २९ नोव्हेंबर)
- सकाळी ११:०० वाजता : ‘भारतीय संविधानाचे आजच्या भारतासाठीचे महत्त्व’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यान
शनिवार (दि. ३० नोव्हेंबर):
- सकाळी ११:०० वाजता: ‘भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताह’ समारोप समारंभ प्रसंगी डॉ रविनंद होवाळ यांचे ‘भारतीय संवैधानिक मूल्ये’ या विषयावर विशेष व्याख्यान
त्याचप्रमाणे, दि २६ नोव्हेंबरपासून ‘भारतीय संविधान निर्मिती’ या विषयावरील चित्रफीतींचे ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. यावर आधारित विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील आयोजित केली जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठातील या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ महाजन यांनी केले आहे.