राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत विद्यापीठातील साहील गावंडे व विवेक टोंगे यांच्या संशोधनाला पारितोषिक
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार
अमरावती : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि रायगड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या साहील गावंडे आणि विवेक टोंगे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाला 2 पारितोषिके मिळाली आहेत. 17 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन – आविष्कार 2025 या स्पर्धेचे लोणेरे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील 26 विद्यापीठांच्या 777 स्पर्धक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळावी यासाठी आविष्कार ही आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेत मानवविज्ञान, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, मूलभूत विज्ञान, कृषी आणि पशूपालन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अशा सहा गटांमधून पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तरोत्तर स्तरांचे विद्यार्थी संशोधन प्रकल्प सादर करतात.
सदर स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 46 विद्यार्थ्यांच्या चमूने 6 गटांतून संशोधनप्रकल्प सादर केलेत. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात पोस्टर सादरीकरणातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 18 विद्याथ्र्यांची पोडियम प्रेझेंटेशनसाठी व दुस-या टप्प्यासाठी निवड झाली आणि त्यातून साहील गावंडे आणि विवेक टोंगे या विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त केली. साहील गावंडे याने स्मार्ट सिस्टिम फॉर थ्रेशिंग मशीन या विषयावर संशोधन प्रकल्प सादर करीत कृषी आणि पशूपालन पदवी गटातून तृतीय क्रमांक (विभागून) प्राप्त केला. तर विवेक टोंगे याने बॅटरी कुलिंग सिस्टिम फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल या विषयावर संशोधन प्रकल्प सादर करत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान – पदव्युत्तरोत्तर गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना संशोधनकार्य पुढे नेण्यासाठी शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक साहाय्य देखील मिळणार आहे.
साहील गावंडे याचे संशोधन शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून त्यामुळे शेतीकाम करणा-या व्यक्तींची जीवितहानी टळणार आहे. थ्रेशिंग मशीनवर काम करताना मशीनमध्ये हात जाऊन किंवा अन्य प्रकारे अपघात घडून शेतक-यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडतात. या समस्येवर साहील गावंडे याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय सुचविला आहे. त्याचे नावीन्यपूर्ण संशोधन समाजोपयोगी असून तज्ज्ञांच्या पसंतीस उतरले आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेला साहील हा धामणगाव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयाचा बी एससी भाग-2 चा विद्यार्थी आहे.
विवेक टोंगे याने इव्हीमधील बॅटरीच्या अतितप्त होऊन स्फोट होण्याच्या समस्येवर उपाय शोधला आहे. त्याने इव्हीसाठी संशोधनपूर्वक नव्या बॅटरीचा उपाय सुचविला असून या बॅटरीद्वारे इव्हीतील स्फोट टळू शकतात तसेच बॅटरीची टीकाऊ क्षमता देखील वाढणार आहे. त्याने शोधून काढलेली बॅटरी दहा वर्षे कालावधीपर्यंत टिकून राहु शकते तसेच त्यामध्ये शीतल व्यवस्था उत्तम ठरल्याने ती अधिक सुरक्षित ठरते. विवेक टोंगे सध्या बडनेरा येथील प्रा राम मेघे तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेत पीएच डी पदवीसाठी संशोधनकार्य करीत असून नावीन्यपूर्ण संशोधनाने अनेकांची मने जिंकून घेतली आहेत.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दलल कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, ननसा संचालक डॉ अजय लाड, आविष्कार समन्वयक डॉ वैशाली धनविजय, मार्गदर्शक विवेक देशमुख, स्वप्नील शेळके, संघ व्यवस्थापक डॉ संयोगिता देशमुख, डॉ प्रणव कोलते तसेच प्रशासकीय सहकारी राजेश भोयर, गृहविज्ञान विभागातील शिक्षक सुमित गेडाम, सुमेध वडूरकर, अशोक हिरे, पालक व गावंडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.