नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
तरुणाईला योग्य दिशा देण्याचे रासेयोचे कार्य – मुरलीधर बेलखोडे यांचे प्रतिपादन
नागपूर : राष्ट्रीय सेवा योजना तरुणाईला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत असून रासेयोची उद्देशिका तंतोतंत अभ्यास करून जीवनात आचरणात आणली तर चांगले नेतृत्व तयार होईल, असे प्रतिपादन निसर्ग सेवा समिती वर्धाचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा महाराज बाग चौकातील दीक्षांत सभागृहात मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेलखोडे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून निसर्ग सेवा समिती वर्धाचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, प्रभारी विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, रासेयो नागपूर जिल्हा समन्वयक डॉ. राजू बुरीले यांची उपस्थिती होती. पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तसेच उत्कृष्ट महाविद्यालयांचे अभिनंदन करीत व्यक्तीचा नसून हा कार्याचा सत्कार असल्याचे बेलखोडे पुढे बोलताना म्हणाले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हिच त्यांच्यासाठी मोठी भेट आहे. तुम्ही वागाल तसे मुले वागतात. त्यामुळे आई-वडिलांची जबाबदारी मोठी असून युवकांना मूल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
रासेयोचे प्रथम समन्वयक एस एस सुब्बाराव यांच्यापासून वृक्ष लागवड व संवर्धन आदी पर्यावरण क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा घेतली असल्याचे श्री बेलखोडे म्हणाले. प्राणवायू तसेच पाणी सर्वांची गरज आहे. त्यामुळे वर्धा येथे उजाड अश्या टेकडीवर तब्बल एक लाख पेक्षा अधिक झाडे लावत त्याचे संगोपन केल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच धाम नदी परिक्रमा करीत सूक्ष्म अभ्यास अहवाल सादर करण्यात आला. यातून धाम नदीचा उगम होत असलेल्या ठिकाणी झरे बुजले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने झरे मोकळे केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांनी जलवायू परिवर्तन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषण करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी रासेयोमध्ये कार्य करणारा विद्यार्थी समाजात मोठा कार्यकर्ता बनतो, असे सांगितले. पूर्वी निसर्गात मनसोक्तपणे वावरता येत होते. मात्र, विकासाच्या प्रक्रियेत निसर्ग हरवत चालला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पंचमहाभूत म्हणजेच निसर्ग वाचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पुढे येण्याचे आवाहन डॉ. दुधे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी २४ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी तसेच महाविद्यालयांना पुरस्कार दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झालेल्या आव्हान शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यापीठाचा प्रथम क्रमांक आल्याची त्यांनी सांगितले तर सोलापूर येथील कार्यक्रमात एकूण १९ पैकी १४ पुरस्कार विद्यापीठाला आपल्या स्वयंसेवकांमुळे मिळाल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तसेच उत्कृष्ट महाविद्यालय यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात स्वयंसेवक संस्कृती पेटकर, तेजस सोनसरे व कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश गायधने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक समन्वयक श्री प्रकाश शुक्ला यांनी केले तर आभार नागपूर जिल्हा समन्वयक डॉ. राजू बुरीले यांनी मानले.
उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
उत्कृष्ट महाविद्यालय श्रेणीत निकालस महिला महाविद्यालय नागपूरचा पुरस्कार प्राचार्य डॉ. सीमा सोमलवार, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूरचा पुरस्कार प्राचार्य डॉ. उज्वला महाजन, रामकृष्ण वाघ कॉलेज बोखारा नागपूरचा पुरस्कार प्राचार्य डॉ. मनीष वानखडे, लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळचा पुरस्कार प्राचार्य डॉ. तीर्थराज कापगते, एन. जे. पटेल मोहाडीचा पुरस्कार प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धाचा पुरस्कार प्राचार्य डॉ. मिलिंद सवई यांनी स्वीकारला.
उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार
उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी श्रेणीत निकालस महिला महाविद्यालय नागपूरच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना लांडे, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसीचे कार्यक्रम अधिकारी श्री सचिन मेंढी, रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ बोखाराचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना काहाळे पत्की, श्री लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश गायधने यांचे एन.जे. पटेल कॉलेज ऑफ मोहाडीचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेशकुमार भैसारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक मगरदे यांना सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार
उत्कृष्ट स्वयंसेवक श्रेणीत सिटी प्रीमियर कॉलेजचा विद्यार्थी तेजस सोनसरे, जवाहरलाल नेहरू कॉलेज वाडी येथील विद्यार्थिनी ज्योती पटले, राणी लक्ष्मीबाई कॉलेज सावरगाव येथील विद्यार्थिनी आरती सावरकर, ताई गोलवलकर कॉलेज रामटेक मधील विद्यार्थी अमय अवथरे, स्व निर्धन पाटील वाघाये कॉलेज लाखनी येथील विद्यार्थी प्रज्वल सावरकर, बजाज सायन्स कॉलेज वर्धा येथील विद्यार्थिनी संस्कृती पेटकर यांचा सत्कार करण्यात आला.