एमजीएम विद्यापीठाच्या प्रा डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांच्या नावे दोन पेटंटची नोंदणी
प्रा.डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यशासाठी अभिनंदन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांना ‘ऑटोनॉमस लाईन मार्किंग रोबोट फॉर प्रिसिजन स्पोर्ट्स फिल्ड मार्किंग आणि ‘एआय बेस्ड डिव्हाईस टू मॉनिटर प्लेयर्स बिहेव्हियर इन फुटबॉल ग्राउंड अँड जनरेट’ या दोन विषयावरील संशोधनासाठी भारत सरकार आणि इंग्लंड सरकारच्या वतीने पेटंट मिळाले आहे.
‘ऑटोनॉमस लाईन मार्किंग रोबोट फॉर प्रिसिजन स्पोर्ट्स फिल्ड मार्किंग’ या विषयावरील संशोधनासाठी प्रा.डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांच्यासह डॉ.संदीप जगताप, डॉ.लिंबाजी परताळे व डॉ.मीना पवार आदींनी या संशोधनात आपले योगदान दिलेले आहे. संबंधित विषयाच्या डिझाईन पेटंटला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे यशस्वीरीत्या नोंदणी झालेली आहे. तसेच फुटबॉल खेळाच्या मैदानावरील खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एआय बेस्ड डिव्हाईस टू मॉनिटर प्लेयर्स बिहेव्हियर इन फुटबॉल ग्राउंड अँड जनरेट’ या डिझाईनला इंग्लंड सरकारच्या ‘युके डिझाईन’ पेटंटसाठी यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे. या पेटंटवर संशोधन करण्यासाठी प्रा.डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांना डॉ.संदीप जगताप, डॉ.महेश राजेनिंबाळकर, डॉ.माणिक राठोड, डॉ.बाळासाहेब सरपटे, डॉ.अस्मा परवीन सय्यद व डॉ.अजय बढे आदींचे सहकार्य लाभले. तसेच या संशोधनाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांना डॉ.दिनेश वंजारे, डॉ.शशिकांत सिंग, डॉ.सेल्वराज व सर्व संबंधित प्राध्यापकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
प्रा.डॉ.मोतीयेळे हे गेली अनेक दशके झाली क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत. ‘एप्लीकेशन ऑफ योगा’ आणि ‘फिटनेस मॅनेजमेंट’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांमध्ये सहभाग घेत आपले संशोधन सादर केलेले आहे.
प्राध्यापक डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी कामगिरीबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, क्रीडा विभागप्रमुख डॉ.दिनेश वंजारे, डॉ.सदाशिव जव्हेरी, डॉ.शशिकांत सिंग, प्रा.रहीम खान, प्रा.प्रवीण शिंदे, निलेश खरे आदि मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.