यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय मानसशास्त्रीय चाचणी विकसन कार्यशाळा संपन्न

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दिनांक १७ व १८ मार्च २०२५ रोजी दोन दिवसीय मानसशास्त्रीय चाचणी विकसन कार्यशाळा संपन्न झाली. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत नोंदणीकृत ६३ पैकी राज्यभरातील मानसशास्त्राचे एकूण ५१ संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व तज्ञ व्यक्तींनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. सदर कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोप सुप्रसिद्ध मानसशास्त्र अभ्यासक प्रा दत्तात्रय तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी बोलतांना कुलगुरू प्रा सोनवणे म्हणाले की मनाच्या संस्कारांचा व व्यक्तीच्या वर्तनाचा परीघ हा अथांग आहे. व्यक्तीच्या वर्तनावरून मन समजून घेणे आणि त्यासाठी शास्त्रशुद्ध व प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या होत असतात. त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास व मानसशास्त्रीय चाचण्या विकसन करणे हे महत्वाचे व क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी नमूद केले. समारोप प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलतांना सुप्रसिद्ध मानसशास्त्र अभ्यासक प्रा दत्तात्रय तापकीर म्हणाले की शिक्षकाची भूमिका समुपदेशकाची देखील असल्यामुळे त्यास मानसशास्त्राचे उपयोजन माहित असणे आवश्यक आहे.

Advertisement

भारतीय ज्ञान प्रणाली आधुनिक ज्ञान प्रणालीशी जोडतांना मानसशास्त्राची भूमिका महत्वाची असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालिका डॉ संजीवनी महाले यांनी सहभागींनी आगामी काळात स्वत: मानसशास्त्रीय चाचणी तयार केल्यानंतर ती प्रमाणित देखील करून घ्यावी असे आवाहन केले. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखा संचालिका व प्रमुख अतिथी प्रा माधुरी सोनवणे यांनी मानसशास्त्र अभ्यासकांनी गेल्या काही वर्षात समाजात झालेल्या बदलाचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष समाजापुढे मांडावेत असे आवाहन केले.

कार्यशाळेत मानसिक क्षमता शोध चाचण्यांची विविध क्षेत्र निश्चिती (प्रा दत्तात्रय तापकीर), मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार (डॉ राजश्री कापुरे), मानसशास्त्रीय चाचण्यांची निश्चिती व प्रश्न निर्मिती प्रक्रिया तसेच मानसशास्त्रीय चाचणी प्रमाणीकरणासाठी सांख्यिकी व इतर निकष माहितीपुस्तिका विकसन (डॉ प्रणीता जगताप), मानसशास्त्रीय चाचण्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया (डॉ सुवर्णा गायकवाड), विशेष गरजा असणाऱ्यांसाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार (डॉ सुकन्या विश्वास), करिअरसाठी चाचण्या (प्रा मृणाल भारद्वाज) व अध्ययनशैली शोधिका प्रशासन, विश्लेषण व अर्थनिर्वचन (डॉ संजीवनी महाले) याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यानिमित्ताने घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेतील विजेती जोडी डॉ संगीता बिहाडे व डॉ वनिता काळे यांना उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ चेतना कामळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. अश्विनी पाटील व डॉ जगदीश जीरे या सहभागींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.    

शैक्षणिक संयोजक वर्षा बहिरम यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. डॉ साधना तांदळे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रमोद वाघ यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा संचालक नागार्जुन वाडेकर, डॉ राजकुमार ननावरे, डॉ प्राणलाल धुर्वे, स्नेहल मांजरेकर, शिवानंद कहाळेकर, ज्ञानेश्वर जाधव, धम्मरत्न जावळे, रवींद्र सोनवणे, प्रदीप शिंदे, प्रतिक कोथमिरे, नितीन जाधव, हर्ष गावित, राहुल पगारे, हेमलता कामाडी, कोमल कदम यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

00:39