एमजीएम विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न

छत्रपती संभाजीनगर : माझ्या शिक्षकांनी मला आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय शिक्षण शिकवले हे मी माझे भाग्य समजतो. आंतरविद्याशाखीय शिक्षणाला आनंददायी बनवत त्याकडे छंद म्हणून पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन गोवा प्रांताचे लोकायुक्त आंबादास जोशी यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लॅग्वेजस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षमीकरणाव्दारे सर्वसमावेशक विकास’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आज एमजीएम विद्यापीठात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी परिषदेचे उद्घाटक म्हणून गोवा प्रांताचे लोकायुक्त आंबादास जोशी हे तर विद्यापीठाच्या वतीने कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, विभागप्रमुख तथा परिषदेच्या समन्वयक डॉ. झरताब अन्सारी, प्राध्यापक, विद्यार्थी, व सर्व संबंधित उपस्थित होते.

Advertisement
Two-day national conference inaugurated at MGM University

लोकायुक्त आंबादास जोशी म्हणाले, विद्यार्थी जीवनात वाचनाला अनन्यसाधारण महत्व असून आपण कोणत्याही विषयात शिक्षण घेत असलो तरी सातत्यपूर्ण वाचन चालू ठेवणे आवश्यक आहे. सगळ्या विषयांच्या अभ्यासाने आपले व्यक्तिमत्व तयार होत असते. सुखी माणसाचा सदरा, कोड नेम ऑफ गॉड, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, अणु विवेक, सिल्वा माईंड कंट्रोल मेथड या पुस्तकांचा उल्लेख करीत त्यांनी वाचनाचे महत्व अधोरेखित केले. एका पेक्षा अधिक कामे करण्यासाठी आपल्याकडे त्या प्रकारचे कौशल्य असणे आवश्यक असून ही कौशल्ये आपल्याला आंतरविद्याशाखीय शिक्षणातून प्राप्त होत असतात. आपण आपल्या क्षमतेला आणि विचारांना मर्यादा न घालता काम केले तर आपली एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण होत असते. निरीक्षण, प्रयोग आणि विश्लेषण या तिन्हींच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक शिक्षणामध्ये वाढ होण्यास मदत होते, असे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

Two-day national conference inaugurated at MGM University

कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर म्हणाले, या दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेत अनेक प्रकारचे विषय चर्चिले जाणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा फायदा होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून चार दशकापूर्वी आंतरविद्याशाखीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. या परिषदेत सर्व प्रकारच्या विद्याशाखांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले असून परिषदेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  परिषदेच्या समन्वयक डॉ. झरताब अन्सारी यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिहाना सय्यद यांनी केले तर आभार प्रा. डॉ.बाळासाहेब सराटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page