हिंदी विश्वविद्यालयात ‘चीनी संस्कृतीचा परिचय’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
मानवता ही जगातील सर्वात मोठी संस्कृती – डॉ प्रेम चन्द्र
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या इंग्रजी व विदेशी भाषा अध्ययन विभागा द्वारे ‘चीनी संस्कृतीचा परिचय’ या विषयावर दोन दिवसीय (१०-११ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन सोमवार, १० फेब्रुवारी रोजी विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुल विद्यापीठ इब्राहिमपट्टणमचे प्राचार्य डॉ प्रेम चन्द्र म्हणाले की, मानवता ही जगातील सर्वात मोठी संस्कृती आहे. भारत आणि चीन या उभय देशांची प्राचीन संस्कृती आहे. संस्कृती ही एक जीवनशैली आहे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी आपण इतिहास आणि साहित्याचा अभ्यास केला पाहिजे असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्रो आनन्द पाटील म्हणाले की द्वंद्वात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला संस्कृतीची मदत घ्यावी लागते. माणूस हा संस्कृतीचा रक्षक आहे. आजच्या परिस्थितीत आपल्याला आत्मपरीक्षण आणि आत्म-विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. स्वागत भाषण भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो एच ए हुनगुंद यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी व विदेशी भाषा अध्ययन विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ अनिर्बाण घोष यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रोफेसर डॉ संदीप कुमार यांनी केले तर सहायक प्रोफेसर सन्मति जैन यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन व कुलगीताने झाली.
यावेळी डॉ अनिल कुमार पाण्डेय, डॉ रवि कुमार, डॉ मैत्रेयी, डॉ हिमांशु शेखर, आम्रपाल शेंदरे, डॉ सरिता भारद्वाज, बी एस मिरगे यांच्या सह अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.