शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषद 2.0
कोल्हापूर |
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने २० व २१ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषद 2.0 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि परिषदेचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. सुभाष माने तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.
या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण, उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणे, नवोपक्रम व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि ‘विकसित भारत – 2047’ हे राष्ट्रीय ध्येय साध्य करणे हा आहे.
परिषदेत नवोन्मेष, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधन-उद्योग सहकार्य आणि स्टार्टअप्स या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे. महिला उद्योजकांच्या यशोगाथा मांडण्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले असून, त्यांच्या व्यावसायिक अनुभवांचे सादरीकरण होणार आहे.
उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती
या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती अश्विनी दानिगोंड (संस्थापक, मनोरा इन्फो-सॉल्यूशन्स प्रा. लि.) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रा. कंदलम रामानुजाचार्य (अमेरिका) आणि डॉ. चंद्रिका कौशिक (दिल्ली) हे सन्माननीय पाहुणे म्हणून लाभणार आहेत.
परिषदेचे अध्यक्षस्थान मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी भूषविणार असून, मा. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परिषदेत प्रा. (डॉ.) मोहम्मद याझीद बिन (मलेशिया), डॉ. महेश सूर्यवंशी (ऑस्ट्रेलिया), डॉ. अहमद इलियास बिन (मलेशिया), गिरीश चितळे (चितळे उद्योग समूह), डॉ. विनायक पारळे (जपान), डॉ. देवव्रत हर्षे, श्री. सचिन कुंभोजे, श्री. योगेश कुलकर्णी, श्रीमती आरती भोसले, श्री. जयदीप चॅटर्जी, मा. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, श्री. रमेश चव्हाण आणि श्री. नितीन वाडीकर यांसारखे नामवंत तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
स्टार्टअप्स, हॅकाथॉन व १५ लाखांचे बीजभांडवल
परिषदेदरम्यान
- स्टार्टअप प्रदर्शन
- पोस्टर स्पर्धा
- इनोव्हेशन हॅकाथॉन
- ‘शार्क टँक’ पिचिंग स्पर्धा
- पेटंट गॅलरी
यांचे आयोजन करण्यात आले आहे. निवडक स्टार्टअप कल्पनांना एकूण १५ लाख रुपयांचे बीजभांडवल प्रदान केले जाणार आहे.
या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन, संशोधन सादरीकरण, करिअर व स्टार्टअप संधी, तर उद्योगपती व गुंतवणूकदारांना नवीन संशोधनाधारित कल्पना व सहकार्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असून, सर्व विद्यार्थी, संशोधक, उद्योगपती, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषात रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
