एमजीएम विद्यापीठात पद्मविभूषण नारळीकर व श्रीनिवासन यांना श्रद्धांजली अर्पण
एमजीएममध्ये दरवर्षी जयंत नारळीकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज पद्मविभूषण जयंत नारळीकर आणि पद्मविभूषण मालूर रामस्वामी श्रीनिवासन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आर्यभट्ट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी पद्मविभूषण जयंत नारळीकर आणि पद्मविभूषण मालूर रामस्वामी श्रीनिवासन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
या श्रद्धांजली सभेस एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.श्रीनिवास औंधकर व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, पद्मविभूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांनी विज्ञानाच्या सत्य गोष्टी सामान्य माणसांना सांगितल्या. एमजीएम संस्थेला त्यांनी अनेकवेळा भेट दिली असून त्यांनी येथील विज्ञानाचे प्रयोग पाहून वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे.
पद्मविभूषण जयंत नारळीकर आणि पद्मविभूषण मालूर रामस्वामी श्रीनिवासन यांच्या दु:खद निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. एमजीएम दरवर्षी डॉ.नारळीकर यांच्या स्मृतीदिनी व्याख्यानमालेचे आयोजन करून त्यांना एक वेगळ्याप्रकारे आठवणीत ठेवणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी केले.
डॉ.श्रीनिवास औंधकर यावेळी बोलताना म्हणाले, पद्मविभूषण जयंत नारळीकर हे माझे गुरु होते. त्यांच्यासमवेत काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. एमजीएम नांदेड येथील वेधशाळेचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. त्यांनी एमजीएमला ४ ते ५ वेळा भेटी दिल्या असून एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रास २०१८ साली देत आम्हाला त्यान मार्गदर्शन केले होते.
एमजीएममध्ये दरवर्षी जयंत नारळीकर स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन
दरवर्षी पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक २० मे रोजी ‘जयंत नारळीकर स्मृती व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत खगोल अंतराळ विज्ञान विषयक अभ्यासक तज्ञ मार्गदर्शक व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेत जिज्ञासू अभ्यासू विद्यार्थी व नागरिकांना मुक्त प्रवेश असणार आहे.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक क्षीरसागर यांनी केले. आजच्या श्रद्धांजली सभेत प्रा. गिरीश बसोले आणि प्रा. क्रांती झाकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.