गोंडवाना विद्यापीठात मोडी लिपीवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
प्राचीन इतिहास अभ्यासण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे – अधिष्ठाता डॉ चंद्रमौली
गडचिरोली : भारतीय संस्कृती ही फार प्राचीन संस्कृती आहे. पुरातन मंदिरे, शिल्प, शिलालेख तसेच ऐतिहासिक स्थळी आजही मोडी भाषा लिहिलेली आढळून येते. मोडी लिपीतून इतिहासाची अनेक भाषिक साधने आपल्याला अभ्यासता येणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात प्राचीन साहित्य व साधनांचा अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिकून त्याचा वापर करणे गरजेचे आहे. असे मानव व विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एस. चंद्रमौली यांनी सांगितले. पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यशाळेला, पुराभिलेख संचालनालय मुंबईचे अभिलेखाधिकारी मनोज राजपूत, नागपूरचे अभिलेखाधिकारी के. डी. खंदारे, मोडी लिपी तज्ञ मनोज महल्ले, पंकज पाटील, पदव्युत्तर इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदकिशोर मने, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नरेश मडावी, इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष सुरडकर, डॉ. प्रफुल्ल नांदे आदी उपस्थित होते. ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत एकूण 92 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली म्हणाले, जीवनात विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे महत्त्व समजून घेता यावे याकरीता या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागाने ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. याकरीता कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी हिरवी झेंडी दिली असून विद्यार्थ्यांना मोडी लिपी शिकता यावी याकरीता संधी उपलब्ध करून दिली आहे, तसेच मोडी लिपीला पुनर्जीवित करून ऐतिहासिक संशोधनासाठी त्याचा वापर व्हावा हा या कार्यशाळेमागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकेत बोलतांना पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदकिशोर मने म्हणाले, राज्यकारभार करतांना मराठ्यांनी पर्शियन, मोडी अशा लिपीच्या वापरातून आदेश किंवा अंमलबजावणी संबंधीची कागदपत्रे स्थानिक राजवटींशी झालेले तह, करार, देण्याघेण्यासंबंधीच्या नोंदीचे लेखन मोडी लिपीतून केलेले पहावयास मिळते. तसेच वाडवडीलोपार्जित संपत्तीच्या नोंदी, अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक विषयावरील लेखन मोडी लिपीमध्ये करण्यात आले आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मोडी कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मोडी लिपीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मोडी लिपीचे स्वरूप, त्याचा काळ गेलेला असला तरी महसूल विभागातील जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती. कार्यशाळेचे संचालन इतिहास विभागाचा विद्यार्थी रमाकांत चव्हाण यांनी तर आभार कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी मानले.