नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागात जैव वैद्यकीय साधनांबाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
विद्यार्थी व शिक्षकांना जैव वैद्यकीय साधनांचे प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञान
नागपूर : जैव वैद्यकीय साधनांच्या प्रत्यक्ष वापराबाबत प्रशिक्षण कार्यशाळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागात सोमवार, दि ७ व मंगळवार ८ एप्रिल २०२५ रोजी पार पडली. विद्यापीठाचा औषधी निर्माणशास्त्र विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि होरिबा इंडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट (HITI) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे, औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आयआयएल संचालक डॉ निशिकांत राऊत यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेत विविध संस्थांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून जैव वैद्यकीय साधनांचे ज्ञान व कार्यानुभव प्राप्त केला. विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकांपर्यंत सर्वांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत बायोकेमिस्ट्री आणि हेमाटोलॉजी अॅनालायझर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मॉर्फोलॉजी प्लॅटफॉर्म्स, पार्टिकल साइज अॅनालायझर्स, आणि रामन स्पेक्ट्रोफोटोमीटर यांसारख्या अत्याधुनिक जैववैद्यकीय उपकरणांविषयी सैद्धांतिक व प्रत्यक्ष ज्ञान देण्यात आले. एकूण १६ तासांचा हा कार्यक्रम बौद्धिक व प्रात्यक्षिक सत्रांमध्ये समान प्रमाणात विभागला गेला होता.
यामध्ये एकूण ८१ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेत बी फार्म (तृतीय व अंतिम वर्ष), अंतिम वर्षाचे विद्यार्थी, एम फार्म, एम एस्सी, पीएच डी संशोधक आणि प्राध्यापकांचा समावेश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण प्रत्यक्ष अनुभव आणि अत्याधुनिक उपकरणे हाताळण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात तज्ज्ञांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश होता. डॉ पुष्कर आदमने यांनी “जैववैद्यकीय उपकरणांची मूलभूत माहिती” या विषयावर व्याख्यान दिले. मुरली एस आर यांनी “हेमाटोलॉजी अॅनालायझर्स विषयी अंतर्दृष्टी” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच, सहभागींना नॅनो-पार्टिकल्स साइज अॅनालायझर व डिजिटल मॉर्फोलॉजी उपकरणांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.
औषध निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक, समन्वयक डॉ निशिकांत राऊत यांनी संयोजक, पीएच डी संशोधक यांच्या योगदानाचे विशेष आभार मानले.
होरिबा इंडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट (HITI) कडून डॉ पुष्कर आदमने आणि अनिकेत खंडाईतकर यांच्या तांत्रिक मदतीबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हा प्रशिक्षण कार्यक्रम होरिबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढविण्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराचे (MoU) फलित आहे.
या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सहभागींना प्रत्यक्ष सत्रांचे परस्परसंवादी स्वरूप व आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव उपयुक्त ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या यशस्वी आयोजनामुळे पुढील काळात अशा अधिक प्रशिक्षण सत्रांची गरज व्यक्त करण्यात आली. औषध निर्माणशास्त्र विभाग व होरिबा इंडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट (HITI) उच्च दर्जाचे प्रशिक्षण कार्यक्रम पुरवण्यास व विद्यार्थी व प्राध्यापकांना त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सक्षम करण्यास कटिबद्ध आहेत. या कार्यक्रमामुळे भविष्यातील फार्मासिस्ट्स आणि संशोधक व्यावसायिक आव्हानांसाठी अधिक सज्ज झाले आहेत.