अमरावती विद्यापीठात एनडीआरएफ पथकाकडून विद्यार्थ्यांना आपत्तीविषयक विविध प्रकारांचे प्रशिक्षण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सुरू असलेल्या चॅन्सलर्स ब्रिगेड – 2024 या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात, महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) स्वयंसेवकांना विविध आपत्तीविषयक घटकांवर तिसऱ्या दिवशीही प्रशिक्षण देण्यात आले.
सकाळी एनडीआरएफ पथकाने विद्यार्थ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्ती व योगाचे सत्र घेतले, ज्याचा उद्देश नियमित व्यायामाच्या सवयीला चालना देणे हा होता. त्यानंतर, आपत्ती व्यवस्थापनासंबंधी सखोल मार्गदर्शन केले गेले. प्रशिक्षणात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा विविध आपत्तींवर चर्चा झाली. आपत्तीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी पूर्वतयारीच्या धोरणांचे महत्त्व आणि त्यासाठी सरकारी व बिगरसरकारी यंत्रणा तसेच नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
‘बेसिक लाईफ सपोर्ट’ (बी एल एस) या विषयावर विशेष मार्गदर्शनात, दुर्घटनेमध्ये हृदयाची गती थांबलेली व्यक्ती किंवा श्वास घेण्यात अडचण असणाऱ्या बालकास मदत करण्याच्या पद्धती शिकविल्या. तसेच, लिफ्टिंग आणि मूव्हिंग प्रात्यक्षिकात विविध प्रकारच्या स्ट्रेचर्स व इतर उपलब्ध संसाधनांचा वापर कसा करावा याची शिकवण देण्यात आली.
प्रशिक्षणाच्या सर्व सत्रांचे आयोजन आणि संचालन एनडीआरएफ पथकातील चंद्रकेतू शर्मा, कृपाल मुळे, अजय यादव, ईश्वर मते, बिरेंद्र जैस्वाल, हरीश ढाकरे यांनी केले, जे या सत्रांना यशस्वी बनविण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.