उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आपले प्रश्न आपले विज्ञान” कार्यशाळेत ४० प्राध्यापकांना प्रशिक्षण
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आयआयटी मुंबई यांनी केलेल्या सामजंस्य करारातंर्गत उन्नत महाराष्ट्र अभियानाचा एक भाग म्हणून “आपले प्रश्न आपले विज्ञान” कार्यशाळेत ४० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमजबजावणीसाठी विद्यापीठ कटिबध्द असून त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा असल्याचे प्रा. इंगळे यांनी सांगितले. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना समुदाय सहभाग, क्षेत्रीय कार्य आधारित अभ्यासक्रम तसेच इंटर्नशिपच्या माध्यमातुन अनुभवजन्य अध्ययन प्राप्त व्हावे या दृष्टीकोनातून “आपले प्रश्न आपले विज्ञान” या मोड्यूलवर आधारित एक दिवशीय कार्यशाळेत तीनही जिल्ह्यातील काही प्राचार्य, समन्वयक व शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले.
उन्नत महाराष्ट्र अभियान कार्यशाळेचे व्यवस्थापक डॉ. गोपाल चव्हाण यांनी “आपले प्रश्न आपले विज्ञान” या माध्यमातुन केसस्टडी कशी उपयुक्त आहे याबाबत मार्गदर्शन केले. स्वप्निल अंबुरे यांनी मोड्यूलची माहिती दिली. चिराग मराठे, रीज्युता काब्बाडी यांनी केसस्टडीसाठी विषय निवड आणि उदिष्ट निश्चिती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तिस-या सत्रात अहवाल लेखन आणि विश्लेषण कसे करावे यासंदर्भात सहभागी शिक्षकांकडून प्रात्याक्षिक करून घेण्यात आले यावेळी आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता प्रा. एस. टी. भुकन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. मनीषा इंदाणी, इजि. राजेश पाटील आदी उपस्थित होते. समन्वयक म्हणून डॉ. मनीषा इंदाणी, डॉ. संतोष खिराडे यांनी काम पाहीले.