उद्याचे भविष्य मॅग्नेटिक बॅटरीचे… – डॉ. आर. एस. शिंदे
एमजीएममध्ये वैज्ञानिक डॉ. आर. एस. शिंदे यांचे व्याख्यान संपन्न
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण जगत आहोत. जग झपाट्याने बदलत असून येणारा काळ मॅग्नेटिक बॅटरीचा असणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. आर. एस. शिंदे यांनी यावेळी केले.महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्स विभागाद्वारे (यूडीबास) विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.शिंदे हे बोलत होते. त्यांनी ‘ऍडव्हान्समेंट इन सायन्स अँड इंजिनियरिंग फॉर सस्टेनेबल फ्युचर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इन रिसर्च अँड इंडस्ट्री फॉर २१ सेंचुरी’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी, विद्यापीठाचे कुलपती श्री.अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, विभागप्रमुख डॉ.के.एम.जाधव, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन ही ताशी ६०० कि.मी.वेगाने धावणारी ट्रेन आहे. याबाबतचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे झाले असून उद्याच्या काळामध्ये हे तंत्रज्ञान आपल्या देशात वापरले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हायपर लूप ट्रेन/व्हेईकल ही ताशी ६०० – १२०० कि.मी.वेगाने धावणारी ट्रेनवरही सध्या संशोधन सुरू आहे. आयआयटी चेन्नई येथे यावरती प्रयोग सुरु आहेत. यासाठी तिथे एक ट्रॅकही बनविण्यात आला आहे. राजा रामन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदोर येथे कमी वाऱ्यावर चालणारी पवनचक्की निर्माण करण्यात आली आहे. ही पवनचक्की अधिक कार्यक्षमपणे कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये मॅग्नेटिक बॅटरी ही सध्या अस्तित्वात असलेल्या बॅटरीला रिप्लेस करू शकते. सध्याच्या बॅटरीपेक्षा मॅग्नेटिक बॅटरी ही अधिक काळ चालणारी बॅटरी असून ज्याचा वापर सगळीकडे होऊ शकतो असे डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.
इस्रोची गगणयान ही आंतरयाळ मोहीम आणि आदित्य ही सूर्याचे संशोधन करण्यासाठीच्या मोहिमेवरती डॉ. शिंदे हे कार्य करीत आहेत. विशेषत: चांद्रयान ३ या मोहिमेतही त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. आज झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यूडीबासचे विभागप्रमुख डॉ.के.एम.जाधव यांनी केले. डॉ.बालाजी मुळीक यांनी वक्ते डॉ.आर.एस. शिंदे यांचा परिचय करून दिला.सूत्रसंचालन डॉ.क्रांती झाकडे यांनी तर आभार डॉ. गणेश पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यूडीबासच्या सर्व प्राध्यापक व संबंधितांचे योगदान लाभले.