उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत तीन संघामध्ये दमदार सामना
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेच्या बाद फेरीत चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदरा, डॉ.सुभाष विद्यापीठ, जुनागड आणि सरदार पटेल विद्यापीठ, गुजराथ हे तीन संघ विविध मैदानांवर झालेल्या सामन्यात विजयी झाले.
अ गटात महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदरा विरूध्द मारवाडी विद्यापीठ राजकोट यांच्यात सामना झाला. महाराजा सयाजीराव विद्यापीठाचा संघ १९.३ षटकात १५० धावा काढून बाद झाला. मारवाडी विद्यापीठाचा संघ अवघ्या ५८ धावांमध्ये १३.५ षटकात बाद झाल्यामुळे बडोदरा संघाने ९२ धावांनी सामना जिंकला. या स्पर्धेत बडोदराचा डॅक्स बी हा खेळाडू सामनावीर ठरला त्याने २४ धावा काढल्या व ३ गडी देखील बाद केले.
ब गटात डॉ.सुभाष विद्यापीठ जुनागडच्या संघाने १२ धावांनी सामना जिंकला. डॉ.सुभाष विद्यापीठाने २० षटकात १५६ धावा केल्या. तर इंद्रशिल विद्यापीठ २० षटकात १४४ धावा करू शकले. सुभाष विद्यापीठाचा रिधम नाकुम हा सामनावीर ठरला त्याने ३८ धावा काढल्या शिवाय ३ गडी टिपले.
ड गटात सरदार पटेल विद्यापीठाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचा एकतर्फी पराभव केला. सरदार पटेल विद्यापीठाचे ८ गडी बाद झाले मात्र त्यांनी १९४ धावांचा डोंगर उभा केला. कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचा संघ ६८ धावांमध्ये (१०.३) षटके बाद झाला. १२६ धावांनी सरदार पटेल विद्यापीठाचा संघ विजयी झाला. प्रितमनी दिप याने ८९ धावा केल्या तो सामनावीर ठरला.