अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातील तीन विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी दिनेश मनोहर वानेरे, अक्षय ज्ञानेश्वर वानखडे व सुरज शंकरराव थोरात सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.
अक्षय वानखडे व सुरज थोरात यांनी नुकताच एम ए (राज्यशास्त्र) अभ्यासक्रम पूर्ण केला असून एम ए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात असतानाच पहिल्याच प्रयत्नात त्यांनी सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. दिनेश वानेरे याने विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 एम ए (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत सातवे स्थान मिळविले होते. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन कालावधीतील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गातही त्याने सहभाग घेतला होता.
तिनही विद्यार्थी ग्रामीण भागातील असून प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. प्रशासकीय अधिकारी होण्याचे या विद्याथ्र्यांचे ध्येय असून यशाचे श्रेय आई-वडील, आपले गुरुजन व मित्रमंडळींना दिले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक महेंद्र भगत, रोहिणी गायधने, डॉ सपना रोंघे, डॉ गजानन ढवळी, हर्षवर्धन रोटे, शितल रोकडे यांचे मार्गदर्शन मिऴाले. त्यांच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, राज्यशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ प्रणव कोलते यांनी अभिनंदन केले आहे.