मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे ३० जून रोजी विशाखा काव्य पुरस्कार वितरण समारंभ आयोजित
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने ‘विशाखा काव्य पुरस्कार’ वितरण समारंभ येत्या सोमवार दिनांक ३० जून २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेन्द्रसिंह बिसेन आणि कुलसचिव दिलीप भरड हे उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठातर्फे ‘विशाखा काव्य पुरस्कार’ प्रथमतःच प्रकाशित काव्यसंग्रहाला दिला जातो. द्विस्तरीय निवड पद्धतीने त्यासाठी तीन सर्वोत्तम काव्यसंग्रहाची निवड केली जाते. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व दहा हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा सन २०२४ पर्यंतच्या राज्याच्या विविध भागातील एकूण २२ पुरस्कारार्थींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये सन २०१८ – प्रथम – तन्वी अमित (निष्पर्ण फांदीवरचे पक्षी), द्वितीय – संतोष आळंजकर (मातीत हरवल्या कविता) व तृतीय – मोहन शिरसाठ (नाही फिरलो माघारी), सन २०१९ – प्रथम – विशाखा विशाखा (तुमुल अंतरीचे) व संदीप शिवाजीराव जगदाळे (असो आता चाड), द्वितीय – विनायक पवार (नामुष्कीचे पिढीजात वर्तमान) व अनिल साबळे (टाहोरा) आणि तृतीय – गजानन फुसे (दिवस बोलू देत नाहीत), सन २०२० – प्रथम – अक्षय शिंपी (बिनचेह-याचे कभिन्न तुकडे), द्वितीय – देवा झिंजाड (सगळं उलथून टाकलं पाहिजे) व तृतीय – नामदेव कोळी (काळोखाच्या कविता), सन २०२१ – प्रथम – तेजस मोदक (तृष्णाकर्ष), द्वितीय – रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत), तृतीय – मेघराज मेश्राम (माणूस असण्याच्या नोंदी) व स्व विवेक काटीकर (दिक्काल धुकं पसरलेले सर्वत्र), सन २०२२ – प्रथम – सरिता सदाशिव पवार (राखायला हवी निजखुण), द्वितीय – प्रवीण अक्कानवरू (औटघटकेची युगांतरं), तृतीय – अमोल विनायकराव देशमुख (आठ फोडा आन बाहेर फेका), सन २०२३ – प्रथम – तान्हाजी रामदास बोऱ्हाडे (जळताना भुई पायतळी), सन २०२४ – प्रथम – सुनीता डागा (तुझं शहर हजारो मैलांवर), द्वितीय – सागर जाधव जोपुळकर (माती मागतेय पेनकिलर) व गौतम राजू ढोके (दंगल होतेच कशी?) यांचा समावेश आहे.
