महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेचा संघ विजेता
जळगाव : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेचा संघ जिल्हास्तरावर विजेता ठरला असून त्यांना एक लाख रुपयांचे बीज भांडवल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हा संघ राज्यस्तरावर होणाऱ्या पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे. पायस सावळे आणि प्रणित मराठे या दोन विद्यार्थ्यांचा संघात समावेश होता. प्रा. राज आमले यांनी संघाला मार्गदर्शन केले तर प्रा. अजय सुरवाडे यांनी स्पर्धेची तयारी करुन घेतली. या दोन विद्यार्थ्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या कामगिरींचे मूल्यमापन करण्यासाठी ॲप तयार करण्याची कल्पना या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मांडली असून त्यासाठी त्यांना एक लाख रुपयांचे बीज भांडवल दिले जाणार आहे. कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. कोल्हे यांनी संघाचे अभिनंदन केले.