राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा CIIIT गडचिरोलीला दौरा
विद्यार्थ्यांशी थेट संवाद; नवोन्मेषी प्रकल्पांचे कौतुक
गडचिरोली :
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT), गडचिरोली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संस्थेतील शैक्षणिक, कौशल्यविकास व उद्योगाभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला.
मुख्य सचिव अग्रवाल यांनी CIIIT मधील विविध प्रयोगशाळा, प्रकल्प सादरीकरण विभागांना भेट देत प्रॉडक्ट डिझाइन अँड डेव्हलपमेंट, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्रियल ऑटोमेशन आदी क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रत्यक्ष कार्यरत मॉडेल्स पाहिले. विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांचे औद्योगिक उपयोग आणि भविष्यातील संधी यांची माहिती दिली.

यावेळी नागपूर विभागीय आयुक्त विजया विजयालक्ष्मी बिदरी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, संचालक न. न. व. सा. प्रो. मनीष उत्तरवार, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) योगेंद्र शेंडे, टाटा टेक्नॉलॉजीजचे भारत प्रकल्प संचालक प्रशांत हांडीगुंड, महाराष्ट्र प्रकल्प संचालक युवराज पाटील, CIIIT चंद्रपूरचे प्रभारी अरुण कोहली, CIIIT गडचिरोलीचे वरिष्ठ अभियंता आनंदा राठोड, तसेच कनिष्ठ अभियंते दिनेश बोलिवार, आदित्य कोल्हटकर, लिखित आखाडे, रोशन गड्डे व CIIIT गडचिरोलीची संपूर्ण टीम उपस्थित होती.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचे, नवोन्मेषी दृष्टिकोनाचे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे विशेष कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना व उद्योजकतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रोजगारनिर्मिती व राज्याच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव देण्यासाठी CIIITसारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रेरणादायी मार्गदर्शन व सामूहिक संवादाने या भेटीचा समारोप झाला.
