आविष्कार संशोधन महोत्सव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची निवड फेरी संपन्न
संशोधन प्रकल्प जागतिक स्तरावर नेण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध – कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ
नाशिक :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार-2025’ संशोधन महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय निवड फेरी यशस्वीरित्या पार पडली. या निवड फेरीतून विद्यापीठाचे राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवासाठी अंतिम संघ निवडण्यात आले.
यावेळी बोलताना कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, ‘आविष्कार’मधील संशोधन प्रकल्प केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता ‘इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट’च्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठाच्या इनोव्हेशन सेंटर अंतर्गत ‘दृष्टी’ कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याद्वारे संशोधन प्रकल्पांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवड झालेल्या विजेत्या स्पर्धकांचा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. प्रविण घोडेस्वार, डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. सुर्यवंशी, श्री. संदीप राठोड, श्री. बाळासाहेब पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संशोधनाला व्यापक व्यासपीठ
परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, निवड झालेल्या संशोधन प्रकल्पांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशन करण्यात येणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन व्यापक स्तरावर पोहोचेल.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी माहिती दिली की, विद्यापीठस्तरीय निवड फेरीत सहा संवर्गातून 207 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर, पीएच.डी. विद्यार्थी व शिक्षक संशोधकांचा समावेश होता.
925 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
‘आविष्कार-2025-26’ स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या असून त्यात 925 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यापीठस्तरीय निवड फेरीतून निवड झालेले संघ 28 जानेवारीपासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे व डॉ. देवेंद्र पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. संदीप राठोड यांनी मानले. या निवड फेरीसाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
