जागतिक स्तरावर भविष्यात भारतातील नर्सेसची भूमिका महत्वाची – कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर
मुंबईच्या नर्सिंग विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला भेट
नाशिक (दि. २२) – “आगामी काळात जागतिक आरोग्य सेवेत भारतातील नर्सेसची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. मुंबईतील पी.डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला दिलेल्या भेटीदरम्यान त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या.
कार्यक्रमास विद्यापीठाचे हरित कक्ष प्रमुख उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे, तसेच हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीमती जैन बाबू आणि श्रीमती सोनाली रेडकर यांची उपस्थिती होती.
कुलगुरु माधुरी कानिटकर म्हणाल्या, “पूर्वी नर्सेसना केवळ डॉक्टरांचे सहायक म्हणून पाहिले जात होते; मात्र आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. कोविड-१९ महामारीने हे सिद्ध केले की आरोग्य सेवांमध्ये नर्सेस अग्रभागी राहून केवळ रुग्णांची काळजीच घेत नाहीत, तर मानसिक आधार देणे आणि आरोग्य शिक्षणाचा प्रसार करणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात.”

त्या पुढे म्हणाल्या, “जगाची लोकसंख्या वाढत असताना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जुन्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी नर्सेसना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. तसेच टेलीहेल्थ, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नर्सेसनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमादरम्यान डॉ. सुनिल फुगारे यांनी रुग्णालयांमधील वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन किती आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन केले. “वापरलेल्या सुया, सिरिज, औषधांच्या बाटल्या यांसारख्या वस्तूंची सुरक्षित विल्हेवाट लावणे हे प्रत्येक आरोग्यसेवकाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले, “स्वप्ने साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि कठीण परिस्थितीतही धैर्याने उभे राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.”
जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी कार्यक्रमाचे समन्वयन आणि सूत्रसंचालन केले. या भेटीदरम्यान नर्सिंग विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातील विविध प्रजातींच्या वृक्षांची माहिती घेतली. अधिसभा सभागृहात आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी कुलगुरु कानिटकर यांच्यासोबत विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर चर्चा केली.
या शैक्षणिक भेटीत पी.डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगचे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
