ज्ञानाची प्रक्रिया भाषेपासूनच सुरू होते- डॉ. डी. टी. शिर्के
कोल्हापूर : ज्ञानाची प्रक्रिया भाषेपासूनच सुरू होते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ‘मराठी विषय अध्यापनातील सर्जनशील कौशल्य’ या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालवाडी ते विद्यापीठ हे दोन शिक्षणातील बिंदू गुणात्मक पध्दतीने जोडण्यासाठी अशा कार्यशाळा व संवाद महत्वाचे ठरतील. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी केंद्रित शिक्षणपध्दती अधिकाधिक विकसित करण्यासाठी या कार्यशाळा निश्चितपणे उपयुक्त आहेत. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ कोल्हापूरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये अध्यापक संघाच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘भाषिक कौशल्य आणि मराठीचे चलनवलन’ या विषयाच्या अनुषंगाने मा. नीती बडवे यांनी मांडणी केली. त्या म्हणाल्या भाषा हा ज्ञान संपादनाचा पाया असून अभिव्यक्ती आणि संपादनकौशल्यासाठी भाषा महत्वाचे काम करते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व असणे ही पुर्वअट आहे. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘भाषिक अनुभव देणे म्हणजे काय’ या विषयाच्या अनुषंगाने मा. सुचिता पडळकर यांनी मांडणी केली. तर कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात ‘भाषा अध्यापनातील विविध दृष्टीकोन या विषयाच्या अनुषंगाने मा. दिपक मेंगाणे यांनी मांडणी केली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.(डॉ.) नंदकुमार मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा.(डॉ.) रणधीर शिंदे यांनी केला. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले. या कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून दोनशेहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. तसेच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.