पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘सोलापूर शार्क टँक – २’ राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन
देशभरातील स्टार्टअप्स व नवोदित उद्योजकांसाठी मोठी संधी
सोलापूर : उद्योजकता, नवकल्पना आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “सोलापूर शार्क टँक – सिझन २” या राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या पोस्टर प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक प्रा. व्ही. बी. पाटील, संचालक डॉ. व्ही. पी. धुळप तसेच उद्यम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुरानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

“सोलापूर शार्क टँक – सिझन २” या स्पर्धेत २५ हून अधिक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सहभागी होणार असून, स्टार्टअप्सना थेट गुंतवणूकदारांसमोर आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या माध्यमातून स्टार्टअप्सना निधी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मौल्यवान अभिप्राय आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे.
विशेषतः विद्यार्थी, संशोधक आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स यांच्यासाठी ही स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, उद्योजकतेची संस्कृती अधिक बळकट करण्यास मदत होणार आहे. सोलापूर आणि परिसरात स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्याच्या दिशेने उद्यम फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून, “सोलापूर शार्क टँक” ही स्पर्धा त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे स्थानिक नवकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळून रोजगारनिर्मिती, स्टार्टअप संस्कृतीचा विकास आणि आर्थिक प्रगती साध्य होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार असून, इच्छुक स्टार्टअप्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी स्टार्टअप्सनी
👉 http://incubation.sus.ac.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
