पेपर फुटी प्रकरण भ्रष्टाचाराचे कुरण – डॉ विजय पांढरीपांडे
पेपर फुटी प्रकरण भ्रष्टाचाराचे कुरण – डॉ विजय पांढरीपांडे
सध्या महाराष्ट्रात सरकारच्या विविध विभागातील स्पर्धा, नियुक्ती परीक्षेचे पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. एखाद्या ठिकाणी लागलेली आग बघता बघता चोहीकडे पसरावी अन् त्यात अनेक जीव होरपळून निघावे अन् अनेकांच्या पोळ्या भाजल्या जाव्यात तशी परिस्थिती आहे.
Former Vice Chancellor Dr. Vijay Pandharipande’s lecture at Devgiri College Aurangabad
करोडो रुपयांची कॅश, कोट्यवधीचे दागिने, मौल्यवान दस्तावेज सापडले आहेत. अनेक जणांना अटक झाली आहे. यात ज्या कंपन्या कडे सरकारने परीक्षेचे काम दिले त्यांचे प्रमुख देखील आहेत ! सखोल चौकशी नंतर आणखीन धागे दोरे हाती लागतील. सरकारी विभागातील कुणाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या अशा स्पर्धा अनेक स्तरावर होतात. आय आय टी प्रवेश परीक्षा, त्या त्या राज्याच्या उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा, यू पी एस सी, एम पी एस सी च्या पूर्व परीक्षा, विद्यापीठाच्या परीक्षा, त्यातील अनेक वेळा पेपर फुटणे, परीक्षा रद्द होणे असे प्रकार घडले आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागातील घोटाळे तर कॉमन आहेत!
काही गैर प्रकार चव्हाट्यावर येतात. ते वृत्तपत्रातून गाजतात. म्हणून त्याची वाच्यता होते. पण त्यातील बरीच प्रकरण आतल्या आत दडपली देखील जातात. विद्यापीठा ची बदनामी होऊ नये म्हणून अंतर्गत गोपनीयतेच्या नावाखाली दाबली जातात. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या इतिहासात आय आय टी प्रवेश परीक्षांचे पेपर फुटल्याचे ऐकिवात नाही. त्या परीक्षेची गोपनीयता, इंटिग्रीटी, पारदर्शीता अबाधित आहे.
फक्त काही वर्षांपूर्वी एका प्राध्यापकाने या परीक्षेच्या निकाला विरूध्द कोर्टात केस दाखल केली होती. हा खटला पश्चिम बंगाल कोर्टात बराच काळ चालला, गाजला. पण तो कसल्या घोटाळ्या संबंधी नव्हता. तर निकाल जाहीर करण्याच्या कार्य पद्धती, नियमावली बद्दल होता. या खटल्याचा एक चांगला परिणाम म्हणजे, आय आय टी ने निकाल नंतर की प्रसिध्द करणे, आक्षेप मागवणे, कट ऑफ पद्धत अधिक पारदर्शी करणे अशा चांगल्या गोष्टीत झाला.
या पेपर फुटी मागे विद्यार्थी पालकाची कसेही करून झटपट यशा मागे धावण्याची विकृत मनोवृत्ती कारणीभूत असते. आपल्याला शिखर गाठायचे आहे. पण पर्वत चढण्याचे श्रम मात्र घ्यायचे नाहीत. आजकाल प्रत्येक स्पर्धा परीक्षे साठी कोचींगची सोय झाली आहे. ही कोचिंग इंडस्ट्री म्हणजे कोट्यवधी चा व्यवसाय झालाय. कोचिंग क्लासेस चे यश हे यशस्वी विद्यार्थ्याच्या संख्येवर अवलंबून !
ती संख्या वाढविण्यासाठी वाटेल ते वां मार्ग अवलंबिले जातात. आधीच पेपर मिळविणे, परीक्षेत तोतया उमेदवार बसविणे, निकालात फेरफार करून घेणे, असे हातखंडे पैशांची देवघेव करून वापरले जातात. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोटाळ्याच्या सुरस चमत्कारिक कथा जशाच्या तशा बाहेर आल्या तर सामान वर्गाचे डोळे पांढरे होतील.
दुर्दैवाने आज आपल्या देशातील वातावरण इतके प्रदूषित झाले आहे की सांगता सोय नाही.
सरकारी यंत्रणेचा कोणताही विभाग असा शिल्लक राहिला नाही ज्याला भ्रष्टाचाराचे, वाम मार्गाचे गालबोट लागलेले नाही ! नियुक्त्या, बदल्या, बढत्या अशा प्रत्येक पायऱ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ! कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. अशी विचित्र परिस्थिती. या मागचे कारण देखील विचित्र. तो करतो म्हणून आम्ही करतो. अवतीभवती कोण स्वच्छ आहे सांगा? सरकारी अधिकारी, आपण निवडून दिलेले पुढारी, मंत्री, पोलीस अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, वकील… कोण स्वच्छ आहे?
सगळी गंगाच जर अशी मैली असेल तर कोण कसा स्वच्छ राहू शकेल? असे प्रश्न विचारले जातात. मग बुद्धीवताना देखील या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे अवघड होऊन बसते. रामायण, महाभारत, वेद पुराण यांचे दाखले देऊन कीर्तन प्रवचन करणारे आध्यात्मिक गुरू आपले समाधान करण्याचा प्रयत्न करतात. ते तेव्हढ्या पुरते पटते. पण माना डोलविण्यापूर्ता तो तात्कालिक प्रभाव असतो. एकूण हे सारे एका कानाने ऐकायचे अन् दुसऱ्या कानाने बाहेर सोडून द्यायचे याच प्रकारातलं!
आजकाल आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैर उपयोग करण्याकडेच जास्त कल दिसतो. सुंदर संविधान आहे. चांगले समाजाभिमुख कायदे देखील आहेत. आपल्याच जुन्या पुराण्या ग्रंथात प्रचंड ज्ञान मौकतिके आहेत. म्हणजे चांगल्या संस्कारा साठी कुठे इकडे तिकडे जाण्याची देखील गरज नाही.
विशेष म्हणजे आपलेच ज्ञान भांडार चोरून, वापरून इतर देश समृद्ध श्रीमंत होताहेत! पण आपल्यालाच आपला इतिहास वाचायचा, अभ्यासायचा नाहीय. आपल्याला आपली जबाबदारी ओळखायची, पार पाडायची नाहीय.व्यावसायिक नीतिमत्ता,मूल्ये पाळयचीच नाहीत.कोण काय करणार?
ही भ्रष्टाचाराची कीड सुध्दा कोरोणा सारखीच किंबहुना त्याही पेक्षा घातक आहे. कोणत्याही लसीचे कितीही डोज घेतले तरी ही लागण थांबणारी नाही. कारण ही कीड प्रत्येकाला फायद्याची वाटते… हा फायदा तात्पुरता आहे, हा मार्ग गर्तेकडे नेणारा आहे हे ज्याचे त्याला कळत नाही, ही खरी शोकांतिका आहे!
या पेपर फुटी प्रकरणात ज्यांनी पैसे घेतले त्यांचीच चौकशी चालू आहे. त्यांनाच दोषी म्हणून खटले चालतील. त्यांनाच (कदाचित) शिक्षा होईल. पण ज्यांनी पैसे दिले त्या गुन्ह्यातील भागीदार उमेदवाराचे,त्याच्या पालकाचे काय? गुन्हा करणाऱ्या इतकाच त्याला मदत करणारा देखील दोषी ठरतो. ते देखील भागीदार ठरतात भ्रष्टाचारात जोपर्यंत या सर्वांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खरे नाही. या सर्वांनाच अद्दल घडली पाहिजे. आपण बलात्कार विरोधात कायदा केला. नारी शक्तीचे संरक्षण करणारे कायदे झालेत. आता या भ्रष्टाचाराचा विषाणू रोखण्यासाठी देखील कठोर कायद्याची गरज आहे.
त्यासाठी राज्य, केंद्र सरकारने पावले उचलली पाहिजेत. यात परिश्रम करणाऱ्या गुणवंत, प्रामाणिक, प्रद्यावान तरुण तरुणीचे नुकसान होते आहे. अशा स्पर्धा परीक्षा साठी प्रामाणिक पणे रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्याचे, गरीबी शी संघर्ष करत काहीतरी स्वबलाने कमविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, सचोटीने वागणाऱ्या तरुण पीढी चे नुकसान होते आहे. त्याच्या स्वप्नांची राख रांगोळी होते आहे. हे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या देशाच्या भविष्य कालीन विकासाच्या दृष्टीने घातक आहे.
यासाठी फक्त सरकारी पातळीवर कायदे करून चालणार नाही. कारण आता अनेकांना कायद्याचे देखील भय वाटत नाही. अनेकदा सरकारी यंत्रणाच या गैर प्रकारात सामील असते! त्यासाठी सामाजिक चळवळ, जन जागृती तितकीच गरजेची आहे. आपल्या देशात अशा अनेक चळवळी यशस्वी झाल्या आहेत. फक्त त्यामागे सर्व मान्य प्रामाणिक प्रयत्नाचे पाठबळ हवे.
हे लढे राजकीय पक्षांपासून अलिप्त हवेत. कारण राजकीय पक्ष आले की मग अनेक विघातक गोष्टी आपोआप येतात. राजकीय प्रदुषणासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत! तेही कारोना सारखे पसरते. त्यामुळे अशा चळवळी जाती, धर्म, पक्ष विरहित असाव्यात. सर्वांनी सर्वासाठी, देशाच्या भल्या साठी द्यावयाचे हे सामायिक योगदान ठरावे. या चळवळीला यश मिळायला थोडा वेळ लागेल. हरकत नाही.
प्रयत्न करायला हवेत. मार्ग खडतर असला तरी या जगात अशक्य काहीच नाही. नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण सर्वांनी हा भ्रष्टाचार विरोधी संकल्प सोडायला काय हरकत आहे? मी, आम्ही लाच देणार नाही, वाम मार्गाने काही लाभ स्वीकारणार नाही हे प्रत्येकाने ठरविले तरी पुरे! समस्या आपोआप सुटेल.
डॉ विजय पांढरीपांडे
७६५९०८४५५५