माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या उपस्थितीत ‘पदम्’ पुरस्कारार्थी गौरव संपन्न
‘विद्यापीठ गेट सुशोभिकरण’ चेही उदघाटन
सामाजिक सहिष्णुता साठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा
भारताचे १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे प्रतिपादन
‘पदम्’ पुरस्कारार्थीचा गौरव सोहळा थाटात.
औरंगाबाद, दि.२२ : महान राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संघर्ष व ज्ञानभूमी असलेला मराठवाडा या दोन्हींचा समावेश असलेले आपल्या विद्यापीठाकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे सामाजिक सहिष्णुता, सौर्हादपूर्ण वातावरणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारताचे १४ वे राष्ट्रपती मा.राम नाथ कोविंद यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारताचे १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी (दि.२२) ‘पदम्’ पुरस्कारांर्थींचा सन्मान सोहळा थाटात संपन्न झाला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ,, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती होती . तर पद्म पुरस्काराने सन्मानित डॉ.प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीश प्रमुणे, शब्बीर सय्यद, कषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रारंभी एोतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या विद्यापीठ गेटचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सुशोभिकरण करण्यात आले. यानंतर विद्यापीठाच्या नाटयगृहात ‘पदम्’ पुरस्कारांर्थींचा सन्मान सोहळा घेण्यात आला. पद्मश्री स्व.फातेमा झकेरिया व पद्मश्री स्व.डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार आला. यावेळी माजी राष्ट्रपती मा.राम नाथ कोविंद यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात आल्यानंतर वीर भुमीत आल्याचा आनंद होत आहे. ‘फुले-शाहु-डॉ.आंबेडकर’ यांची वैचारिक व प्रबोधनाची भुमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करुन जनतेचे मनात स्वराज्याचे स्फुलिंग पेटविले. मराठवाडा ही संताची भुमी असून या विद्यापीठाला चळवळीचा वारसा असल्याचा गौरवही मा.कोविंदजी यांनी केला. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणान त्यांनी अनेक मुद्दे मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी सर्व पद्म पुरस्कारांर्थींचा माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये पद्मश्री दादासाहेब इदाते, गिरीश प्रभुणे, डॉ.प्रभाकर मांडे, शब्बीर सय्यद व रमेश पतंगे व कृषीतज्ज्ञ श्रीरंग लाड यांना गौरविण्यात आले. तर डॉ.यु.म.पठाण यांच्यावतीने पुत अतिक पठाण व अरमास पठाण यांनी सतकार स्विकारला तर स्व.फातेमा झकेरिया व स्व.डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव फरहम जमाल व डॉ.निवेदिता पानतावणे यांनी स्विकारला. यावेळी रमेश पतंगे यांनी गौरवार्थीच्यावतीने मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान हा सामाजिक क्रांतीचा दस्ताऐवज आहे, असे ते म्हणाले. या सोहळयाचे सूत्रसंचालन डॉ.मुस्तजिब खान व डॉ.अपर्णा अष्टपुत्रे यांनी केले. तर कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी आभार मानले.
पद्म पुरस्कारांर्थीचा हा संपुर्ण सोहळा अत्यंत नियोजनबध्द व शिस्तबध्दरितीने पार पडला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. प्रारंभी डॉ.गणेश शिंदे यांनी ‘विद्यापीठ गेट’ वर तयार केलेली ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली.
विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल: मा.कुलगुरु
विद्यापीठाच्या इतिहासातील हा एक गौरवाचा क्षण असणार आहे. परिवर्तनाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या ‘विद्यापीठ गेट’ चे सुशोभिकरण पुर्ण झाले, याचा मनस्वी आनंद आहे, भारताचे १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळ्याची नोंद विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने होईल, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षीय समारोपात केले . दहा वर्षांपुर्वी भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आले होते. आता या सोहळयाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आले आहेत.
वंचितांचा सहवास, हाच आमचा श्वास
गौरव सोहळयात पद्म पुरस्कारांर्थीची भावना
वंचित, कष्टकरी, शेतकरी समाज घटकांचा नियमित लाभलेला सहवास हाच आमच्या जगण्याचा श्वास आहे, अशी भावना पद्म पुरस्कारांर्थीनी मांडली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओळखल्या जाणा-या विद्यापीठांच्या सत्कारनंतर बोलतांना अनेकांचा कंठ देखील दाटून आला. यावेळी पद्मश्री डॉ.दादासाहेब इदाते, डॉ.प्रभाकर मांडले, गिरीश प्रभुणे, सय्यद शब्बीर, कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीरंग लाड म्हणाले, येत्या २०५० मध्ये असणा-या लोकसंख्येला लागेल एवढे अन्नधान्य आपण निर्माण करीत आहोत. कष्टाला फळ मिळते तसे यंत्रालाही फळ मिळते. यावेळी गिरीष प्रभुणे म्हणाले, देशाचा कणा असलेल्या आदिवासी समाजबांधवासाठी काही करता आले याचा मनस्वी आनंद आहे. हस सन्मान या कष्टकरी लोकांनाच समर्पित करीत आहे. तर दादासाहेब इदाते म्हणाले, भारतातील भटक्या-विभुक्त लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्यही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच करु शकलो. त्यांना जगण्याचं भान निर्माण करुन देता आले याचं समाधान आहे. तर आयुष्यात जे जे दिसलं, मनाला भावलं ते शब्दातून मांडलं, याचा एवढा मोठा गौरव झाला. नागसेनवणातील शिक्षणाला हा गौरव सर्मपित करतो, असे डॉ.प्रभाकर मांडे म्हणाले.