संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्ष सेलची सभा संपन्न
विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर समितीचा भर
अमरावती : खाजगी संस्था, खाजगी विद्यापीठांशी आता स्पर्धा वाढत चालली आहे, अशा परिस्थितीत सार्वजनिक विद्यापीठांना शैक्षणिक, संशोधन आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यावर भर द्यावा लागेल, असा एकंदरीत सूर विद्यापीठ राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्ष सेल समितीच्या सभेत निघाला. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी सेलचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे आदी उपस्थित होते. डॉ येवले यांनी यावेळी उपस्थितांना विद्यापीठाची गुणवत्ता कशी वाढेल, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व संशोधनात्मक भविष्य कसे घडविले जावू शकेल, याविषयी उपस्थित विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी व महाविद्यालयांच्या प्राचार्य यांना मार्गदर्शन केले.
डॉ प्रमोद येवले मार्गदर्शन करतांना म्हणाले, गुणवत्ता हमी हा राज्यस्तरीय सेल असून शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने स्थापित केला आहे. शासन, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधील हा दुवा असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील ज्या शैक्षणिक विभागाला जेथे शिक्षक व विद्यार्थी संख्या अधिक आहे, अशा निवडक चार ते पाच विभागांना ऑटोनॉमस करणे आवश्यक असून सर्व विभागांचे अकॅडमिक ऑडिट करणे, रिसर्च पेपर्स, प्रोजेक्ट यांना कॅस व प्रमोशनशी लिंक करणे, संलग्नित महाविद्यालयांचे नॅक करणे तसेच विद्यापीठाने जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी संस्थाचालक व प्राचार्यांची संयुक्त सभा घ्यावी, असे डॉ येवले यांनी सूचित केले. नॅक प्रक्रिया सुलभ झाली असून शासनाने त्यासाठी लागणारे शुल्क देखील कमी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नॅक मूल्यांकनात सी ग्रेड असलेले महाविद्यालये देखील स्वायत्तता घेवू शकतात अशी माहिती सुध्दा त्यांनी यावेळी दिली.
दुपारच्या सत्रात ‘बी’ प्लस व त्यावरील नामांकन प्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा झाली. सभेत 25 महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सभेत स्वायत्तता घेण्यासाठी येणा-या समस्यांवर समितीचे अध्यक्ष डॉ प्रमोद येवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समितीने योग्यरितीने निरसन केले. महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी नॅक करणे किती आवश्यक आहे, हे देखील समितीच्या अध्यक्षांनी उपस्थितांना पटवून दिले.
कौशल्याधारित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालये आपली आर्थिक बाजू सक्षम करू शकतील. दिडशे संस्था अशा आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारचा फंड देतात त्याची माहिती देवून याबाबत समितीच्या अध्यक्षांनी तामिळनाडूमधील महाविद्यालये कशी आर्थिकदृष्ट्या संपन्न झालीत, त्याची उदाहरणे देऊन ती बाब पटवून दिली.
विद्यापीठाचे आयक्यूएसी संचालक डॉ संजय वाघुळे यांनी पीपीटीच्या माध्यमातून विविध विषयांबाबत विद्यापीठाची सद्यस्थिती विषद केली. यावेळी समितीने विद्यापीठात उपलब्ध असलेले कन्सलटन्सी व आय पी एल पॉलीसी वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यावर व जे महाविद्यालय नॅक करीत नाही, त्यांना पुढील संलग्निकरण देवू नये अशा सूचना दिल्यात.
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी समितीकडून मिळालेल्या सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले व विद्यापीठाच्यावतीने सर्वांचे आभार मानले. सभेला नोडल अधिकारी डॉ सुलभा पाटील, गुणवत्ता हमी कक्ष समिती सदस्य डॉ स्वाती शेरेकर, डॉ राहुल म्हात्रे, मुंबई, डॉ पांडुरंग बरकले, डॉ भालचंद्र वायकर, संभाजीनगर उपस्थित होते. सभा आयोजनासाठी विकास विभाग व इन्क्युबेशन सेंटरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत.