राजभवनात राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक संपन्न

कृषि विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

कृषि विद्यापीठांचे वित्तीय अधिकार वाढविण्याच्या सूचना

मुंबई : कृषि हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषि विकासात कृषि विद्यापीठांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषि विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे दिल्या. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीला  कृषि  विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे (व्यय) अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांमध्ये बांधकाम करण्यासाठी तसेच यंत्रसामग्री खरेदीसाठी ठरवून दिलेली निधीची कमाल मर्यादा फार पूर्वी ठरविण्यात आली असून कुलगुरुंचे वित्तीय अधिकार वाढवून देण्यासाठी शासन स्तरावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना राज्यपालांनी या बैठकीत केल्या. बैठकीत राज्यपालांनी सर्व कृषि विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या अध्यापक तसेच बिगर शिक्षकांच्या पदांचा आढावा घेतला व रिक्त जागा भरण्याबाबत विद्यापीठ तसेच शासनातर्फे केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.   

Advertisement

कृषि विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच ‘जमीन वापर धोरण’

राज्यातील कृषि विद्यापीठांकडे उपलब्ध असलेल्या जमिनींसंदर्भात विविध घटकांकडून मागणी होत असते. यासंदर्भात एक समग्र ‘जमीन वापर धोरण’ तयार करण्याबाबत शासन विचार करीत असल्याची माहिती अनूप कुमार यांनी बैठकीत दिली.  जागतिक हवामान बदलांमुळे राज्यात अतिवृष्टी व अनावृष्टीची वारंवारता वाढली आहे असे नमूद करून कृषि विद्यापीठांनी या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी लागवडीबाबत मार्गदर्शक प्रणाली तयार करावी अशी सूचना त्यांनी केली.     

बैठकीत उच्च कृषि शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे, कृषि वैज्ञानिक व विद्यार्थ्यांना विदेश दौऱ्यावर पाठविण्यासाठी कुलगुरूंना प्राधिकृत करणे, नोकरीत असलेल्या उमेदवारांना अध्ययन रजा देण्याबाबत अधिकार कुलगुरुंना देणे, खासगी कृषि महाविद्यालयांचे व्यवस्थापन सुधारणे, विद्यापीठांचा आकस्मिकता निधी वाढवणे, इत्यादी विषयांवर चर्चा झाली.  

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्र मणि व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांनी बैठकीत आपापल्या विद्यापीठांच्या समस्या मांडल्या.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page