सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या १८ व्या बॅचचे दीप प्रज्वलन व शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न
८० नवोदित परिचारिकांचा मानवसेवेचा संकल्प
हिंगणा / नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय, नागपूर येथे बीएससी नर्सिंगच्या १८ व्या बॅचसाठी दीपप्रज्वलन व शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा महत्त्वपूर्ण सोहळा २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला.

दीपप्रज्वलन हा क्षण प्रत्येक नर्सिंग विद्यार्थिनीच्या आयुष्यात एक संस्मरणीय टप्पा असतो, कारण याच क्षणापासून तिच्या सेवाभावी प्रवासाची औपचारिक सुरुवात होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीरा कडबे (निर्देशक, तरुण भारत, नागपूर), डॉ मनीषा शेमबेकर (व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ, ओमेगा हॉस्पिटल, नागपूर), तसेच महर्षी कर्वे संस्थेच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत चितळे, श्रीकांत गाडगे आणि सुरेखा सराफ हे मान्यवर उपस्थित होते.
मीरा कडबे यांनी विद्यार्थिनींना नर्सिंग व्यवसायातील नैतिकतेचे व सेवाभावाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रूपा वर्मा यांनी संस्थेची माहिती देत संस्थेच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात विविध नामांकित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, तसेच नागपूरमधील प्रमुख रुग्णालयातील कर्मचारी परिचारिका सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्यात ८० नवोदित विद्यार्थिनींनी मानवजातीच्या निस्वार्थ सेवेची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अक्षय सदाशिव व काजल घाटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन तक्षशीला मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
डॉ रूपा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या टीमने अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.