पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची प्रेरणादायी ‘स्वदेशी संकल्प दौड’
देशासाठी स्वदेशी, लोकशाहीसाठी मतदान करा
सोलापूर | प्रतिनिधी |
स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि हुतात्मा दिनाचे औचित्य साधत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे सोलापूर शहरात भव्य ‘स्वदेशी संकल्प दौड’ आयोजित करण्यात आली. या दौडीत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार आणि मतदान जनजागृती यांचा प्रभावी संदेश देत शहराचे लक्ष वेधून घेतले.
दौडदरम्यान विद्यार्थ्यांनी
“स्वदेशीचा स्वीकार – देशाच्या विकासाचा आधार”,
“भारतीय वस्तू वापरा, देश मजबूत करा”,
“मतदान हा अधिकारच नव्हे तर कर्तव्य आहे”,
“लोकशाही बळकट करूया”
अशा घोषणा देत राष्ट्रभक्ती आणि लोकशाही मूल्यांचा जागर केला.

ही संकल्प दौड राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग, स्त्री शक्ती स्वयंसिद्धा केंद्र, प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान (PM-USHA) आणि स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
दौड रंगभवन येथील विद्यापीठ अभ्यास केंद्रापासून सुरू होऊन डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हुतात्मा चौक येथे समारोपात पोहोचली.
या कार्यक्रमात सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांचे मार्गदर्शन
या रॅलीचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा अंगीकार करून तरुणांनी राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करावे. स्वदेशीचा स्वीकार आणि मतदानातील सक्रिय सहभाग हे मजबूत लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.
स्वदेशी चळवळ म्हणजे राष्ट्रीय स्वाभिमान
स्वदेशी जागरण मंचचे चन्नवीर बंकुर यांनी स्वदेशी चळवळ ही केवळ आर्थिक बाब नसून ती राष्ट्रीय स्वाभिमानाशी जोडलेली चळवळ असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, एनएसएस संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, वित्त व लेखाधिकारी सी. ए. महादेव खराडे, परीक्षा विभाग संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. अंजना लावंड तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दौडदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे सोलापूर शहरात राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांविषयी सकारात्मक जागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
