मातृभाषेतील प्राथमिक शाळा संपवणाऱ्या देशाचे भवितव्य अंधारात – प्रा. आनंद मेणसे
विवेकानंद महाविद्यालयात आयोजित ‘विवेकानंद व्याख्यानमाले’ अंतर्गत त्यांनी “महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्न : भाषा, संस्कृती व राजकारण” या विषयावर अभ्यासपूर्ण संवाद
छत्रपती संभाजीनगर : मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण नष्ट करणाऱ्या देशाचे भवितव्य अंधारात जाते, असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध स्तंभलेखक प्रा. आनंद मेणसे यांनी केले. येथील विवेकानंद महाविद्यालयात आयोजित ‘विवेकानंद व्याख्यानमाले’ अंतर्गत त्यांनी “महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्न : भाषा, संस्कृती व राजकारण” या विषयावर अभ्यासपूर्ण संवाद साधला.
कार्यक्रमास विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अक्षयभाऊ शिसोदे व उपाध्यक्ष मा. अमरभाऊ शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत व्याख्यानमालेची पार्श्वभूमी विशद केली.

महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नावर परखड मांडणी
प्रा. मेणसे म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात दीर्घ व अद्याप न सुटलेली चळवळ म्हणजे महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांचा लढा होय. १९२४ च्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी भाषावार प्रांतरचनेचा विचार मांडला होता; मात्र स्वातंत्र्यानंतर अनेक आयोग, संमेलने व सत्याग्रह होऊनही सीमाभागातील ७० टक्के मराठी भाषिकांचा अस्मितेचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सीमाभागातील मराठी शाळांवर कन्नड भाषेची सक्ती, अनुदान बंद करण्याचे निर्णय आणि त्यातून मराठी भाषा व संस्कृतीवर होणारे आघात याबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाकडून या विषयावर ठोस पावले उचलली जात नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले. २००४ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेला सीमावादाचा खटला आजही सुनावणीस न लागणे ही शासनाच्या उदासीनतेचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राथमिक शिक्षण व मुलींच्या शिक्षणावर परिणाम
महाराष्ट्रात कोट्यवधींचे खर्च इतर उपक्रमांवर होत असताना हजारो मराठी शाळा बकाल करून बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका प्रा. मेणसे यांनी केली. प्राथमिक शिक्षणाचे खाजगीकरण किंवा महागडीकरण झाल्यास मुलींचे शिक्षण सर्वात आधी बाधित होते, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.
नागरिक–विद्यार्थी संवाद
कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. मेणसे यांनी सविस्तर उत्तरे दिली. शहरातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शर्मिष्ठा ठाकूर यांनी केले.
