महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘समर इंटर्नशिप प्रोग्राम’चा ‘फ्लॅग ऑफ सेरेमनी’ उत्साहात संपन्न

संशोधनासाठी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत होणे अत्यावश्यक – कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (MUHS) आज ‘समर इंटर्नशिप प्रोग्राम’चा ‘फ्लॅग ऑफ सेरेमनी’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, “संशोधनासाठी कुतूहल जागृत होणे आवश्यक आहे. समस्या समजून घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील राहिल्यासच समाजोपयोगी संशोधन शक्य होते. दैनंदिन जीवनातील घटनांचे निरीक्षण करून संशोधनाची दिशा ठरवावी.”

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावहारिक आणि कौशल्य विकासाची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “ही इंटर्नशिप केवळ शिक्षणाचा भाग नसून, ती विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी परिचय करून देणारी संधी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणेच्या संचालिका डॉ. शर्मिला बापट यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांनी “विद्यार्थ्यांनी रोजगारासाठी संशोधनाच्या वाटेवर चालावे, जेणेकरून देशाचा नावलौकिक वाढेल,” असे प्रतिपादन केले. क्लिनिकल रिसर्चमध्ये असलेल्या अपार संधींचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Advertisement

मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी माहिती दिली की आतापर्यंत विद्यापीठात १०० पेक्षा अधिक समर इंटर्नशिप प्रोग्राम्स पार पडले असून त्यात १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांनी इनोव्हेशनसाठी आवश्यक बाबींचा उहापोह या उपक्रमातून होत असल्याचे सांगितले.

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी समर इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. “विद्यापीठ शिक्षणासोबतच व्यावहारिक अनुभवावर भर देत आहे. ही पुढील संशोधकांची पिढी घडवणारी संकल्पना आहे,” असे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमात उपकुलसचिव श्री. एन.व्ही. कळसकर, प्रमुख पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *