गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षांत समारोह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

आदिवासी जनतेच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका – महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन

सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी लिट पदवी प्रदान

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी बहुल भागामध्ये उत्तम शिक्षणाचा पायंडा पाडला असून ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यापीठामुळे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. अभ्यासक्रमाबरोबरच विद्यापीठाच्या रोजगारक्षम उपक्रमांमुळे आदिवासी जनतेच्या विकासामध्ये गोंडवाना विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत राज्याचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. त्‍यानंतर राज्यपाल यांच्या हस्ते आचार्य पदवी, विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पदविकांक्षींना पदवी प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग आदी मान्यवर राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाकडून मला खूप अपेक्षा आहेत. इथल्या आदिवासी लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याची विद्यापीठामध्ये प्रचंड क्षमता आहे. एक कुलपती म्हणून माझ्यावर या भागातील आदिवासी जनतेची जबाबदारी आहे. या भागातील लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विद्यापीठाच्या मदतीने नियोजन करणे शक्य होईल.
गोंडवाना विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये एनईपीचा अवलंब केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करुन इथल्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना मेडिकल तसेच आयआयएम सारखे रोजगाराभिमुख दर्जात्मक शिक्षण उपलब्ध होण्याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले.

Advertisement

ते म्हणाले, पदवी मिळविणे ही खूप कठीण गोष्ट असून ती सहज साध्य करता येत नाही. शिक्षणामुळे माणसाच्या विकासाचे द्वार खुले होते. शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागते. शिक्षण ही मोठी ताकद आहे असे सांगून त्यांनी पदवी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मानद डी लिट पदवी स्वीकारताना जुन्या आठवणी दाटून आल्या. माझ्या वडिलांना वाटायचे मी डॉक्टर व्हावे पण मी डॉक्टर होऊ शकलो नाही. पण आज विद्यापीठाने मला डी. लिट. पदवी देऊन माझा सन्मान केला त्यामुळे आयुष्यातली अपूर्णता पूर्णतेत बदलली. विद्यार्थ्यांना पदवी मिळणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. शिक्षणाने माणूस समृध्द होतो असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वैराचाराचा मार्ग न अवलंबता संस्कारी मार्गाचा अवलंब करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला.

ते म्हणाले, विद्यापीठाने डी. लिट. देऊन मला विकास कामे करण्याची शक्ती दिली आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मी मोठा निधी मागितला असून विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी जेंव्हा इथे प्रवेश घ्यायला येतील तेंव्हा या विद्यापीठाचा हेतू पूर्ण झाला असे वाटेल. ते स्वप्न विद्यापीठ लवकरच पूर्ण करेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दीक्षांत समारंभामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु जी व पी जी मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या 10 हजार 226 इतकी असून 55 विद्यार्थ्यांना पीएच डी तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु जी व पी जी मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या 13 हजार 607 इतकी असून 25 विद्यार्थ्यांना पीएच डी, 1 विद्यार्थ्याला एम ई संशोधन पदवी तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

कुलपती, कुलगुरु, प्रमुख पाहुणे, अतिथी, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्याशाखेचे अधिष्ठाता यांचे दीक्षांत मिरवणुकीने सभागृहात आगमन झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

कुलगुरु डॉ. प्रशान्त बाकारे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन विद्यापीठ प्रगती अहवालाचे वाचन केले. प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ नरेंद्र आरेकर व डॉ अपर्णा भाके यांनी केले. आभार कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांनी मानले.

याप्रसंगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मिलिंद बारहाते, माजी कुलगुरु, प्रशासकीय अधिकारी, माजी प्र-कुलगुरु, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page