एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिवस संपन्न
राज्यपालांसह राहीबाई पोपेरे यांची वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थिती
एसएनडीटी महिला विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र निर्माण करावे – राज्यपाल रमेश बैस
पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये येण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन
मुंबई : मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देश-विदेशातील लोक या शहराला भेट देत असतात. महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दृश्यता’ वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘आउटरीच सेंटर’ निर्माण करावे, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केली. अश्या प्रकारच्या प्रदर्शन केंद्रामुळे मुंबईला येणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अतिथींना विद्यापीठाची महती व संशोधन, गृह विज्ञान, क्रीडा व इतर क्षेत्रातील उपलब्धी समजण्यास मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिवस राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि ५) विद्यापीठाच्या महर्षी कर्वे शैक्षणिक परिसर, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी सन १९१६ साली याच दिवशी विद्यापीठाची स्थापना केली होती. यावेळी विषमुक्त शेती व देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु डॉ रुबी ओझा, कुलसचिव विकास नांदवडेकर, माजी कुलगुरु रूपा शाह व चंद्रा कृष्णमूर्ती, सुधीर ठाकरसी, अधिष्ठाता, अध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
महर्षी कर्वे यांनी महिला सक्षमीकरणाच्या कार्याला सुरुवात केली त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. भारतीय समाज अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांमध्ये गुरफटला होता. महिला साक्षरतेचे प्रमाण नगण्य होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे आणि इतर दृष्ट्या व्यक्तींनी केलेल्या कार्यामुळे देशात महिला शिक्षण तसेच सक्षमीकरणाचे कार्य शक्य झाले असे सांगताना महिला विद्यापीठाने श्रेष्ठ १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्था, व्यवसाय, कॉर्पोरेट तसेच विद्यापीठांमध्ये महिला नेतृत्वस्थानी आहेत. नागरी सेवा, पोलीस सेवा आणि सशस्त्र दलांमध्ये देखील महिलांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे. भारताच्या स्टार्टअप क्रांतीमध्ये देखील महिला उद्योजक आघाडीवर आहेत. परंतु विकसित राष्ट्रांच्या तुलनेत देशातील कार्यबलामध्ये महिलांचा सहभाग कमी आहे. महिलांना कौशल्ये प्रदान करून आणि त्यांची सध्याची कौशल्ये उन्नत करून श्रमशक्तीमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा, असे राज्यपालांनी सांगितले.
उच्च शिक्षणात सकल नोंदणीचे गुणोत्तर ५० इतके साध्य करण्याचे दृष्टीने विद्यापीठाने शाळांमध्ये जाऊन भावी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच त्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग करावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.
अवघ्या चार विद्यार्थिनींपासून सुरू झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ आज ३९ विभाग, १३ संस्था आणि ३०७ महाविद्यालये यांच्या माध्यमातून ६९००० विद्यार्थिनींना उच्च शिक्षण देत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले.
प्रगतीशील शेतकरी राहीबाई पोपेरे यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासोबतच शेकडो देशी बियाणांच्या संवर्धनासाठी अद्भुत काम केले असल्यामुळे राहीबाई पोपेरे या स्वतःच कृषी क्षेत्रातील ‘विद्यापीठ’ झाल्या आहेत असे सांगून विद्यार्थिनींनी राहीबाईंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतःचा स्वतंत्र मार्ग निर्माण करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.
प्रत्येकाचे ताट विषमुक्त व्हावे : राहीबाई पोपेरे यांच्या संदेशाने विद्यार्थीनी भारावल्या
आपण शाळेची पायरी चढलो नाही, परंतु निसर्गाची शाळा शिकलो. सेंद्रिय शेती करून व देशी वाण घराघरातून पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सीड बँक तयार केली. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले. माती वाचवली तर पिढ्या वाचतील असे सांगून विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे ज्ञान ज्ञावे परंतु निसर्गाचे देखील ज्ञान घ्यावे असे राहीबाई पोपेरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सेंद्रिय शेतीला चालना देऊन विषमुक्त अन्न तयार झाले पाहिजे. या कार्यात विद्यापीठांनी देखील हे काम हाती घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात किमान एक राहीबाई असावी व प्रत्येकाचे ताट विषमुक्त झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. राहीबाई पोपेरे यांच्या संवादाने विद्यार्थिनी भारावल्या. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठातील सर्वोत्तम महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी यांना भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच निवडक विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सुरुवातीला राज्यपालांनी भारतरत्न महर्षी कर्वे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.