‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी रवाना
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपन्न होत असलेल्या २० व्या ‘इंद्रधनुष्य’ आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे.
दि ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत असलेल्या या युवक महोत्सवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंतांनी एकूण २८ पैकी २१ कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला असून, या युवक महोत्सवात लोकनृत्य, स्किट, एकांकिका, वक्तृत्व, वादविवाद, सुगम गायन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय सुरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, इन्स्ट्रुमेंटल सोलो, शास्त्रीय नृत्य, मिमिक्री इत्यादी कला प्रकारासह वांग्मय, संगीत, नृत्य, नाट्य व ललित कलेतील सर्व कलाप्रकारात विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेऊन तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिरात कसदार तयारी केलेली आहे.
गतवर्षीच्या इंद्रधनुष्य महोत्सवात आदिवासी नृत्य व ‘लोकसंगीत वाद्यवृंद’ (फोक आर्केस्ट्रा) या कलाप्रकारात राष्ट्रीय युवक महोत्सवात नैपुण्य मिळवत विविध युवा महोत्सवातून विद्यापीठाच्या कलावंतांनी आपल्या विद्यापीठाची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपन्न होत असलेल्या इंद्रधनुष्य महोत्सवासाठी ललित कला विभागाचे प्रशिक्षक सिद्धार्थ नागठानकर, वांगमय विभागाचे प्रशिक्षक म्हणून डॉ संदीप काळे, संगीत विभागाचे प्रशिक्षक डॉ शिवराज शिंदे, नाट्य विभागाचे प्रशिक्षक विजय मस्के, नृत्य विभागाचे प्रशिक्षक सचिन गोने, डॉ पांडुरंग पांचाळ, नवलाजी जाधव, दिलीप डोंबे आदींनी मार्गदर्शन केले. तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ साईनाथ उमाटे आणि प्रा माधुरी पाटील यांचा संघामध्ये समावेश आहे.
या महोत्सवात उज्वल यश संपादन करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी विद्यार्थी कलावंतांना शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ डी डी पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, अधिष्ठाता डॉ एम के पाटील, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांनी विद्यार्थी कलावंतांना भरभरून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी कलावंत वादक प्रशिक्षक साथीदार असा सर्वांचा मिळून ५५ जणांचा संघ इंद्रधनुष्य महोत्सवासाठी रवाना झाला आहे.