‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ पश्चिम विभागीय युवक महोत्सवासाठी नागपूर येथे रवाना
नांदेड : पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सव दि २२ ते २६ जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (महाराष्ट्र) येथे संपन्न होत आहे. या महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी असून, ललित कला, लोकवाद्य वृंद, संगीत कला यासह एकूण १८ कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थी कलावंत सज्ज असून, विद्यार्थी कलावंत, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक यांच्यासह एकूण ४० जणांचा संघ नागपूर येथे रवाना झाला आहे. मागील वर्षी आंतरविद्यापीठ, पश्चिम विभागीय व राष्ट्रीय युवक महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी करून, विविध कला प्रकारात नैपुण्य मिळवले. त्याच धर्तीवर पश्चिम विभागीय युवक महोत्सवामध्ये सुद्धा आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या नैपुणाने चमकतील असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी स्पर्धक कलावंतांना शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक डॉ. संदीप काळे, संघ व्यवस्थापिका डॉ. माधुरी पाटील, प्रशिक्षक डॉ. शिवराज शिंदे, सिद्धार्थ नागठाणकर, दिलीप डोंबे, यांचा संघात समावेश आहे. कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे व बालाजी शिंदे हे संघासोबत आहेत. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी दिली. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवामध्ये भरीव यश मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून हे विद्यार्थी कलावंत प्रशिक्षण शिबिरामध्ये कसून सराव करत आहेत. विद्यापीठ संघाच्या यशप्राप्तीसाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ. मनोज रेड्डी, उपकुलसचिव डॉ. हुशारसिंग साबळे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींनी सहभागी स्पर्धक कलावंतांना यशप्राप्तीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.