पश्चिम विभागीय युवा महोत्सवासाठी सोलापूर विद्यापीठाचा संघ नागपूरला रवाना
22 जानेवारीपासून महोत्सव; 40 जणांची टीम
कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडून शुभेच्छा!
सोलापूर : यंदाचा पश्चिम विभागीय युवा महोत्सव दि. 22 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे होणार आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ शनिवारी रवाना झाला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ. प्रकाश महानवर यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. चांगले सादरीकरण करून पारितोषिके मिळवा, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे उपस्थित होते.
युवा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांची पश्चिम विभागीय महोत्सवासाठी निवड झाली आहे. दि. 6 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विद्यापीठ कॅम्पसमध्ये सराव शिबिर झालेला आहे. नृत्य, नाट्य, संगीत, ललित, वाङ्मय विभागातील विद्यार्थ्यांनी पश्चिम विभागीय युवा महोत्सवासाठी सहभाग नोंदवलेला आहे. पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ 25 कला प्रकारात भाग घेतलेला आहे. एकूण 40 जणांचा चमू यात सहभागी होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कुलगुरू प्रा. महानवर यांनी शुभेच्छा दिल्या. संघप्रमुख म्हणून प्रा. प्रमोद पाटील आणि प्रा. तेजस्विनी कांबळे हे काम पाहणार आहेत.