राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणार भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित शिक्षक विकास कार्यक्रम
जगद्गुरु श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च (JSDIVSR) सोबत करणार सामंजस्य करार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित शिक्षक विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालीबाबत शिक्षक विकास कार्यक्रम राबविता यावा म्हणून विद्यापीठाकडून जगद्गुरु श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च (JSDIVSR) सोबत सामंजस्य करार केला जाणार आहे.

विद्यापीठातील शिक्षकांना वर्षभर या अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित माहिती देणारे कार्यक्रम राबविले जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पदवी अभ्यासक्रम भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित २ क्रेडिटचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरा शिकविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि कौशल्य शिक्षकांना प्राप्त व्हावे म्हणून शिक्षक विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमामुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय ज्ञान परंपरे विषयी जागरूकता निर्माण होईल आणि त्याला प्रोत्साहन मिळणार आहे. विद्यापीठासोबत संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये या शिक्षक विकास कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमाची रचना प्रशिक्षक व्यक्तींची निवड आणि तांत्रिक बाबी जगद्गुरु श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च यांच्याकडून हाताळल्या जाणार आहेत. भारतीय ज्ञान परंपरेविषयी विद्यापीठातील शिक्षक तसेच संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना माहिती व्हावी म्हणून असा कार्यक्रम राबविण्याबाबतचे पत्र तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या शुभहस्ते देण्यात आले आहे.
यावेळी राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, आय आय एल संचालक डॉ निशिकांत राऊत, मिशन फॉर डेव्हलपमेंट अँड डिव्हिनिटी ट्रस्टचे सचिव श्री प्रकाश कावले, कोषाध्यक्ष निरंजन देशकर, JSDIVSR बोर्डचे सदस्य अनुराग देशपांडे, भारतीय ज्ञान परंपरा केंद्र संचालक आचार्य श्रेयस कुरहेटकर, सदस्य सुमेध पाठक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च वेदविज्ञान आणि संशोधन क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे. प्राचीन भारतीय ज्ञान आणि समकालीन शैक्षणिक गरजांमधील तफावत कमी करणे संस्थेचे उद्दिष्ट आहे. भारतीय ज्ञान प्रणालीचे पुनरुज्जीवन आणि संस्थापन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण परिवर्तनात्मक पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.