स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात साजरी
नाशिक : प्रखर राष्ट्रनिष्ठा व देशभक्तीचे प्रतीक असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या कार्यक्रमात कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, “अतोनात छळ असूनही सावरकरांचे देशप्रेम डगमगले नाही. त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या कार्याला समर्पित होते.” त्यांनी सावरकरांना प्रखर राष्ट्रनिष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून गौरवले.
प्र-कुलगुरू डॉ. बिसेन यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “सावरकरांनी स्वतःच्या कुटुंबापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याला व राष्ट्र उभारणीस अधिक महत्त्व दिले.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले. कार्यक्रमास वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, ज्ञानस्त्रोत केंद्र प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे, विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.