दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात विदर्भस्तरीय ‘स्वरवैदर्भी’ सिनेगीत गायन स्पर्धेचे आयोजन

तब्बल ७५ हजारांचे रोख पुरस्कार

वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त विदर्भातील युवा गायकांसाठी ‘स्वरवैदर्भी’ हिंदी सिनेगीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची निवड फेरी शनिवार, दि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित असून विजेत्या स्पर्धकांना एकूण ७५ हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.

स्वरवैदर्भीचे हे बाविसावे वर्ष असून यापूर्वी पार्श्वगायिका वैशाली माडे, धनश्री देशपांडे, अभिषेक मारोटकर, श्रुती जैन, रसिका चाटी, नितीन वाघ, डॉ गौरी बोधनकर, रसिका व कृतिका बोरकर, कैवल्य केजकर, मानसी हेडाऊ, गीत बागडे अशा अनेक सुपरिचित गायकगायिकांनी ही स्पर्धा गाजविली आहे. यावर्षी १५ ते ३५ या वयोगटाकरिता ही हिंदी सिनेगीत स्पर्धा घेण्यात येणार असून प्राथमिक फेरीतून महाअंतिम स्पर्धेसाठी १२ स्पर्धकांची निवड केली जाईल. अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना स्वरवैदर्भी सन्मानचिन्हासह प्रथम २२ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११ हजार आणि उर्वरित स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ३ हजार असे एकूण ७५ हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील. स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क केवळ २०० रुपये असून ही संपूर्ण रक्कम दरवर्षी सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयाला रुग्णसहायता निधीकरिता देण्यात येते.

Advertisement

या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता गायकांनी दि २८ ऑगस्टपर्यंत प्रवेशपत्र भरावयाचे आहे. प्रवेशपत्रासोबत स्पर्धकाने वयाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. निवड स्पर्धा दि ३१ ला सकाळी ९ वाजता सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात सुरू होईल. निवड फेरीत हिंदी चित्रपट गीताचे धृपद आणि केवळ एक कडवे सादर करावयाचे आहे. स्पर्धकांसाठी संवादिनी, तबला व अन्य वाद्यांची आणि वादकांची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येईल. स्पर्धेतील सर्वच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्वरचाचणी स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या १२ गायकगायिकांची महाअंतिम स्पर्धा मेघे अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात रविवार, दि ८ सप्टेंबर रोजी सायंकालीन सत्रात होणार आहे. ही महाअंतिम स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये होणार असून ‘मेरी पसंद’ या पहिल्या फेरीत स्पर्धक आपल्या आवडीचे गीत गातील. द्वितीय फेरी ‘मै हर इक पल का शायर हूं’ ही असून स्पर्धक दिवंगत गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या सिनेगीतांचे सादरीकरण करतील. तर ‘महाराष्ट्र गौरव’ ही तिसरी फेरी असून यात मराठी भाषेतील स्फूर्तिगीत स्पर्धकांना सादर करावे लागेल.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गायकांनी स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२), सहसंयोजक अभय जारोंडे (९७६५४०४०४८) अथवा सुनील रहाटे (९९२१२८७४०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे महासंचालक डॉ राजीव बोरले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page