एमजीएम विद्यापीठात ‘स्वच्छ ताट अभियान’ जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी घेतली अन्न वाचवण्याची शपथ
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईन आणि अन्न वाचवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ ताट अभियान’ जनजागृतीपर कार्यक्रम मंगळवार, दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी विद्यापीठात संपन्न झाला. समितीचे अध्यक्ष अनंत मोताळे यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, प्रा नितीन गायकवाड, प्रा निलेश बनसोड, प्रा कविता राजपूत, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत मोताळे म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश असूनही आपल्या देशात आज मोठ्या प्रमाणात लोक भुकमारीने मरत आहेत. आज हॉटेल, लग्नसोहळा आणि इतर कार्यक्रमांमध्ये अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसते. जागतिक भूक निर्देशांकानुसार आपल्या देशात दरवर्षी २४४ कोटी रुपयांचे अन्न वाया जात असून यावर सरकारने कायदा तयार करण्याची गरज आहे.
कलाकार हा कलेच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहत असतो. एक परिपूर्ण माणूस होण्यासाठी अंगी कला असावी पण त्याचबरोबर आपले दैनंदिन व्यवहारही महत्त्वाचे ठरत असतात. आपल्याला शक्य तितके अन्न वाचवत अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो, हा विचार प्रत्येकांनी करणे काळाची गरज असल्याचे अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा निलेश बनसोड यांनी केले तर आभार प्रा कविता राजपूत यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांना अन्नाची नासाडी टाळण्यासाठी खालील शपथ देण्यात आली.
“आम्ही सहकुटूंब संकल्प करतो की, ताटात उष्टे अन्न सोडणार नाही. अनावश्यक अन्न ताटात घेणार नाही. आमच्या कुटूंबातील लग्नामध्ये मर्यादित पदार्थ करू व अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेऊ. आम्ही अन्नाच्या प्रत्येक कणाचा सन्मान करतो. आम्ही स्वच्छ ताट अभियायानाचा सदस्य बनुन या अभियानाचा प्रसार आणि प्रचार करू. आपण सर्वांनी अन्न नासाडी न करण्याचा संकल्प करूया!”