शिवाजी विद्यापीठात ‘सूर – चैतन्य साधना‘ सांगीतिक कार्यशाळा संपन्न
संगीत शिक्षणात सांगीतिक साक्षरता आवश्यक – पं. राजा काळे
कोल्हापूर : ‘संगीत केवळ परीक्षेसाठीन शिकता अंतर्मुखतेने संगीताचा अभ्यास करा. स्वरसाधनाही भक्तिपूर्वकझाली पाहिजे. गाण्याचा अभ्यास करताना त्यातील भाव समजून घेण्यासाठी गाण्याचे काव्य आणि स्वरलगाव यांचा अभ्यास आवश्यक आहे. ही सांगीतिक साक्षरता संगीताच्या शिक्षणात अतिशय आवश्यक आहे’. असे प्रतिपादन प्रख्यात गायक पं. राजा काळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर – चैतन्य साधना‘ या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.
या कार्यशाळेमध्ये पं. राजा काळे यांनी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचे मर्म सुगमतेने उलगडून दाखवले. ‘संगीत ही आत्म्याची भाषा असल्याने आपला सूर, गाणे हे आत्म्याला भिडणारे असले पाहिजे. संगीत शिकताना केवळ संगीताचे व्याकरण न शिकता संगीताचा काव्यात्मक व सौंदर्यात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. केवळ रागगायन न करता त्या रागाची धून बनली पाहिजे. परीक्षेसाठी गाणे न शिकता गाण्यासाठी गाणे शिका. गाण्यावर प्रेम करायला शिका. संगीताच्या परंपरेचा चांगला अभ्यास करा’. असे मौलिक संगीतचिंतन पं. राजा काळे यांनी मांडले. शास्त्रीय संगीताबरोबरच चित्रपट संगीत, सुगम संगीतातील अनेक दाखले देऊन त्यांनी आपले संगीतविचार उलगडून सांगितले. याप्रसंगी पं. राजा काळे यांचे शिष्य श्याम जोशी यांनी स्वरसाथ केली, तर प्रशांत देसाई यांनी तबलासाथ केली. कोल्हापुरातील ज्येष्ठ गायक पं. विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते पं. राजा काळे यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूर देसाई यांनी प्रास्ताविक केले. अतुल परीट यांनी कलाकारांचा परिचय करून दिला तसेच आभारप्रदर्शनकेले. या कार्यशाळेस विभागाचे आजी-माजी विद्यार्थी, संगीत क्षेत्रातील जाणकार, रसिक, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.