शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील विद्यार्थ्यांचे जर्मन भाषा आंतरराष्ट्रीय परीक्षेत यश
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागात इतर विदेशी भाषांबरोबरच ‘जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाच्या बरोबरीचा आहे. विभागातील ‘जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’च्या १० विद्यार्थ्यांनी नुकतेच ग्योथे इन्स्टिट्यूट (मॅक्स म्युलर भवन) या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्टार्ट डॉइश A -1’ या आंतरराष्ट्रीय जर्मन भाषा परीक्षा दिली व ती उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रेरणा शिर्के, मृणाल कुलकर्णी, सिद्धराज माने, अनिरुद्ध पाटील, विश्वजीत पाटील, सुजाता सरनाईक, निकिता पागवे, योगेश कांबळे, साक्षी पाटील, हर्षवर्धन माने या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
‘स्टार्ट डॉइश A -1’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेण्यासाठी विभागाने विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांच्या या यशात विदेशी भाषा विभागातील जर्मन भाषा शिक्षिका श्रद्धा खवरे यांचे मोठे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय जर्मन भाषा परीक्षेतील यशाबद्दल विदेशी भाषा विभागाच्या विभागप्रमुख डॉ मेघा पानसरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना भविष्यात जर्मन भाषा क्षेत्रात अनेक करीअर संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील विविध अभ्यासक्रमांचा लाभ कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी, घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.