शरद पवार दंत महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुयश

आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चमकले दंतशाखेचे विद्यार्थी

वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपल्या उत्तुंग प्रतिभेची व कल्पकतेची चुणूक दाखवीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

नुकत्याच सायनोडेंट व इंडियन सोसायटी ऑफ डेंटल रिसर्च (आयएसडी) यांनी मध्यप्रदेशातील लखनौ येथील किंग जॉर्जस् वैद्यकीय विद्यापीठात आयोजित केलेल्या बाराव्या जागतिक दंतविज्ञान व मौखिक आरोग्य परिषदेत शरद पवार दंत महाविद्यालयातील शिवानी पथा या विद्यार्थिनीच्या पोस्टर सादरीकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. डॉ शरयु निमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानीने ‘द फ्युचर ऑफ मेक्सिलोफेशिअल डेंटिस्ट्री : एआय – पॉवर्ड इनोव्हेशन्स अँड ऍप्लिकेशन्स’ या विषयावरील पोस्टर सादर केले.  

Advertisement

तर, दुसरी आंतरवासीय विद्यार्थिनी नंदिनी ठकरानी हिला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पियर फाऊचार्ड अकादमी इंटरनॅशनल सीनियर स्टुडंट अवॉर्ड’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला. दंतचिकित्सा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान आणि समर्पणाकरिता दरवर्षी भारतातील केवळ १५ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जात असून शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. 

दंतविज्ञान शिक्षण आणि संशोधनासाठी मेघे अभिमत विद्यापीठात नियमित दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी सतत ही कामगिरी बजावत आहेत, असे अधिष्ठाता डॉ मनोज चांडक यांनी आवर्जून सांगितले. विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे, प्र-कुलगुरू डॉ गौरव मिश्रा, महासंचालक डॉ राजीव बोरले, संचालक डॉ तृप्ती वाघमारे, अधिष्ठाता डॉ मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ अलका हांडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ अंजली बोरले यांनी या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page