महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हेल्थ रन २०२४ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे यश
जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक आयोजित हेल्थ रन २०२४ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रा अभिजित राठोड आणि बी एस्सी (नर्सिंग) पाचव्या सत्राचे विद्यार्थी भिसन बारेला यांनी यश मिळवले आहे. या स्पर्धेचा उद्देश समाजात सुदृढ आरोग्यासाठी चालणे आणि धावण्याचे महत्त्व पटवून देण्याचा होता.
या हेल्थ रनमध्ये गोदावरी नर्सिंगचे ३० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. ३ कि मी शर्यतीत प्रा अभिजित राठोड यांनी द्वितीय क्रमांक पटकावत रु ८०००/- रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक मिळवले. त्याचबरोबर, बी एस्सी नर्सिंग पाचव्या सत्रात शिकणारा विद्यार्थी भिसन बारेला याने पाचवा क्रमांक मिळवून रु ५०००/- रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक प्राप्त केले.
या विजेत्यांचा सत्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट कर्नल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या हेल्थ रनमध्ये महाराष्ट्रातील विविध आरोग्य विज्ञान महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.