डॉ डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ जयंत घाटगे यांचे यूपीएससी परीक्षेत यश

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात वरिष्ठ कृषी अभियंता म्हणून निवड

डी वाय पाटील बी टेक ऍग्री, कृषी व तंत्र विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

तळसंदे : डॉ डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी टेक ऍग्री) तळसंदेचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक तसेच डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ जयंत सर्जेराव घाटगे यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात वरिष्ठ कृषी अभियंता म्हणून निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून निवड करण्यात आलेल्या सात अभियंत्यांमध्ये डॉ घाटगे यांनी स्थान मिळवले आहे. या परीक्षेतून निवडले जाणारे अधिकारी देशाच्या कृषी संशोधन, प्रसार आणि विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Success of Dr. Jayant Ghatge of Dr. DY Patil Agricultural Engineering College in UPSC Exam
युपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल डॉ जयंत घाटगे यांचे अभिनंदन करताना डॉ संजय डी पाटील.

डॉ. जयंत सर्जेराव घाटगे यांनी डॉ डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून बी टेक (ऍग्री) ची तर महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान येथून एम टेक व पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक तसेच संशोधन पर कामासाठी त्यांची ओळख आहे. डॉ जयंत यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांना दिले आहे. डी वाय पाटील बी टेक (ऍग्री) महाविद्यालय येथील विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाचा अनुभव हा खूप उपयोगी पडला. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे चांगले यश मिळवता आले. यापुढे कृषी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीत नवनवीन संशोधन करून भारतीय कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा मानस असल्याचे डॉ जयंत घाटगे यांनी सांगितले.

Advertisement

डॉ घाटगे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलपती तथा डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्राध्यपक असलेल्या घाटगे यांचे यश अतिशय कौतुकास्पद व अभिमानस्पद आहे. देशाच्या कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात ते नक्कीच मोठे योगदान देतील असा विश्वास डॉ पाटील यांनी व्यक्त केला.

बी टेक ऍग्रीचे प्राचार्य डॉ एस बी पाटील म्हणाले, डॉ जयंत घाटगे यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दाखला आहे. त्यांचे हे यश महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तसेच या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ के प्रथापन, कुलसचिव डॉ जयेंद्र खोत यांनी डॉ जयंत यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page