विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

कला धरोहर अंतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन

नांदेड :परिस्थिती विषम असेल तर विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा परिस्थिती विरुद्ध लढत राहावे तरच ध्येय गाठता येते. कम्फर्टझोन मधून बाहेर पडणे आणि सतत कष्ट करत राहणे विद्यार्थी जीवनात महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. संगीत नाटक अकॅडमी नवी दिल्ली यांच्या कलाधरोहर या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध भारूडकार चंदाताई तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी व्यासपीठावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. शैलजा वाडीकर, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, संध्या तिवारी उपस्थित होत्या.

Advertisement
विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे - कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
Students should keep fighting instead of crying over the situation - Vice Chancellor Dr. Manohar Chaskar

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या लोकगीत गायनाने करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. राज्यस्तरीय क्रीडा युवा महोत्सवात लोकगीत कलाप्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल संकुलाच्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक डॉ. शिवराज शिंदे यांचा कुलगुरू डॉ. चासकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सिद्धांत दिग्रसकर आणि राज्य नाट्य स्पर्धेत रंगभूषेकरिता प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल गजेस्विनी देलमाडे यांचाही सत्कार करण्यात आला.छंदाचे कलेत व कलेचे व्यवसायात रूपांतर होणे आवश्यक आहे. तसेच कलावंताच्या ठाई सामाजिक बांधिलकी असलीच पाहिजे असेही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक किरण सावंत यांनी केले. प्रास्ताविक डॉ. पृथ्वीराज तौर व शेवटी प्रा नामदेव बोंपिलवार यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल गायकवाड, प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार, निशिकांत गायकवाड, गजानन हंबर्डे, गणेश महाजन परिश्रम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page