नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी ‘छावा’ चित्रपटातून जाणली छत्रपती संभाजी राजांची माहिती
विद्यापीठ पदव्युत्तर इतिहास विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तुत्वाची माहिती जाणून घेतली. पदव्युत्तर इतिहास विभाग प्रमुख डॉ शामराव कोरेटी यांच्यासह ३८ विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून २० फेब्रुवारीला सामूहिकरित्या “छावा” चित्रपट बघितला.

“छावा” चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडीची माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक छावा चित्रपटाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. संभाजी महाराजांना मिळालेल्या आयुष्यात त्यांनी किती अफाट कर्तृत्व गाजविले हे चित्रपट पाहिल्यानंतर कळते. छावा चित्रपटाची पटकथा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे.
ऐतिहासिक घटनांशी कुठलीही तडजोड न करता छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचे कार्य दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी केलेले आहे. कथा, कादंबरीतून संभाजी महाराजांच्या चरित्रावर शिंतोडे उडविण्यात आले. परंतु, छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांना खरा न्याय दिला, असं चित्रपट बघितल्यानंतर वाटते. संभाजी महाराजांना मिळालेल्या अल्प आयुष्यात ते १२५ लढाया लढले आणि त्यात यशस्वी झाले. याच काळात ते कुटुंब प्रमुख म्हणून, पती म्हणून, पिता म्हणून, मुलगा म्हणून आणि राजा म्हणून कसे होते याचे दर्शन या चित्रपटातून मिळते.
औरंगजेबाने संभाजी महाराजांचे कैदेत असताना खूप अतोनात हाल केले. परंतु संभाजी महाराज शेवटपर्यंत झुकले नाही. या चित्रपटात संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा दाखविण्यात आली म्हणूनच संभाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकाला प्रेरणादायी वाटते. हा चित्रपट बघताना विद्यार्थी फार भावुक झाले होते. शेवटच्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. छावा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी एकदा बघावा असा आहे. स्वाभिमान आणि शौर्य छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने या चित्रपटातून पाहायला मिळते.
चित्रपट संपल्यानंतर बाहेर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्या त्यात विभाग प्रमुख डॉ शामराव कोरेटी यांनी या चित्रपटाविषयी समाधान व्यक्त केले. ऐतिहासिक संदर्भांना कुठलीही छेडछाड न करता संभाजी महाराजांच्या शौर्याचा खराखुरा इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आला अशी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व प्रा अशोक नैताम यांनी केले.