एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले ‘मराठा साम्राज्याचे चलन’
एमजीएममध्ये ‘मराठा साम्राज्याचे चलन’ विषयावर एकदिवसीय परिसंवाद संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संस्था व दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय परिसंवाद यशस्वीपणे संपन्न झाला. या परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘मराठा साम्राज्याचे चलन व शिवकालीन इतिहास’ अभ्यासण्याची संधी मिळाली.
यावेळी, महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाचे संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, नाणे अभ्यासक प्रशांत ठोसर, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, संचालक डॉ. झरताब अन्सारी, प्रा. आशुतोष पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी व संबंधित उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्य निर्माण होत असताना आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणे ही काही साधारण घटना नव्हती. पर्शियन भाषेचा प्रभाव झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची नाणी ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.
शिवाजी महाराजांनी आपली सोन्याची नाणी मुघलांच्या परिमाणाची न पाडता, विजयनगरच्या परिमाणाची आणि तांब्याची नाणी निजामांच्या परिमाणावर पाडली. स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे नाणे ‘शिवराई’ स्वराज्याला मिळाले. त्याकाळची परिस्थिती पाहता, मुघलांच्या नाण्यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर होता. पर्यायाने त्यांचीच नाणी सर्वत्र चलनात होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पैसेही काही प्रमाणात चलनात होते. अशा वेळी एका नव्या राजाने सुरू केलेले चलन बाजारात टिकेल का? ते मुघलांच्या नाण्यांची बरोबरी करू शकेल का, हे प्रश्न पडले असावेत; पण पडलेल्या प्रश्नांप्रमाणे काहीही झाले नाही. शिवराई नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले. आजच्या झालेल्या परिसंवादात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महराजांच्या काळातील चलनांची अशा प्रकारची सविस्तर माहिती मिळाली.
स्वराज्याच्या चार छत्रपतींची नाणी” या विषयावर नाणे अभ्यासक प्रशांत ठोसर यांनी यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी परिसंवादात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना दर्शनिका विभागाकडून प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप बलसेकर तर सुत्रसंचालन अमृता राऊत यांनी केले.
या परिसंवादात मान्यवरांनी मांडलेले विचार खालीलप्रमाणे आहेत.
डॉ. दिलीप बलसेकर : शिवराई व नाणे मुल्य विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे . शिवकाळात ३१ प्रकारचे नाणी ३०० वर्ष चलनात होती. विद्यार्थ्यांनी चलनांचा अभ्यास करीत असताना ब्रिटिश नाणी व शिवकालीन नाणी यांचा तुलनात्मक अभ्यास करणेही आवश्यक आहे.
प्रशांत ठोसर : नाणी जरी सारख्या आकाराचे असले तरी प्रत्येक शासकाचे नाणे काही प्रमाणात वेगळे होते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी शिवचरित्र आणि भागवतगीतेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. इतिहासामधील काही गोष्टी शब्दार्थ, भावार्थ आणि गुरार्थ या तीन पातळीवरती अभ्यासल्या गेल्या पाहिजेत.
प्रा. आशुतोष पाटील : शिवकाळात विविध धातूंची नाणी चलनात होती, हि नाणी टांकसाळीत तयार केली जात असत. नाण्याच्या धातुवरून त्या राज्यातील आर्थिक परिस्थितीचा उलगडा होतो. नाण्याच्या तिसऱ्या बाजुचा म्हणजे त्यामागील इतिहासाचा अभ्यास करून त्यामागील पुरावे शोधून नाणकशास्त्राचा अभ्यास केला जाणे गरजेचे आहे.